कौटुंबिक वादातून तरुणांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

अटक आरोपींमध्ये पित्यासह त्याच्या दोन मुलांचा समावेश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 एपिल 2025
मुंबई, – कौटुंबिक वादातून अभय अजीत खारवा या 22 वर्षांच्या तरुणाची हत्या करुन पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना अटक करण्यात नागपाडा पोलिसांना यश आले आहे. अटक आरोपींमध्ये पित्यासह त्याच्या दोन मुलांचा समावेश आहे. विजय खारवा, विक्रम विजय खारवा आणि सागर रसिक खारवा अशी या तिघांची नावे आहेत. यातील विक्रम आणि सागर या दोघांना शनिवारी दुपारी किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे तर विजय खारवा याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी सांगितले. या गुन्हयांत विक्रम विजय खारवा याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.

अजीत बाबू खारवा हे कापड व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत बोईसर येथील गणेशनगर परिसरात राहतात. विजय हा त्यांचा मेहुणा असून तो विरार येथील चंदन सर नगर, बुद्धपाडा, नवशक्ती इमारतीमध्ये राहतो. अजीतने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला होता. याच कारणावरुन अजीत आणि त्याचा मेहुणा विजय यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरु होता. त्यातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. गुरुवारी अजीत हा त्याचा मुलगा अभय याच्यासोबत मोबाईल खरेदीसाठी नागपाडा येथे आला होता. रात्री उशिरा तीन वाजता ते दोघेही कामाठीपुरा, बारावी गल्ली, व्हीआर तुल्ला मैदानाजवळून जात होते. यावेळी तिथे विजय हा त्याचे दोन्ही मुले विक्रम आणि विशाल यांच्यासोबत आला.

कौटुंबिक वादातून या तिघांनी खारवा पिता-पूत्रावर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात ते दोघेही जखमी झाले होते. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी तेथून पळून गेले होते. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच नागपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या दोघांनाही पोलिसांनी तातडीने जवळच्या नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे अभयला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर अजीत खारवा यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी पळून गेले होते. या तिघांच्या अटकेसाठी नागपाडा पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

ही शोधमोहीम सुरु असताना शुक्रवारी विक्रम आणि सागर या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही शनिवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या अटकेनंतर शनिवारी सायंकाळी त्याचे वडिल विजय खारवा याला पोलिसांनी अटक केली. त्याला रविवारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. विजय खारवा आणि विक्रम खारवा हे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध नागपाडा व मालवणी पोलीस ठाण्यात काही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. विक्रमला यापूर्वी एक वर्षांसाठी मुंबई शहरातून तडीपार करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page