कौटुंबिक वादातून 22 वर्षांच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या
हल्ल्यात कापड व्यापारी जखमी तर मेहुण्यासह मुलांविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 एपिल 2025
मुंबई, – कौटुंबिक वादातून अभय अजीत खारवा या 22 वर्षांच्या तरुणाची त्याच्याच नातेवाईकांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात अभयचे वडिल आणि कापड व्यापारी अजीत बाबू खारवा हे जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी पिता-पूत्रांविरुद्ध नागपाडा पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. विजय चतुर खारवा, विक्रम विजय खारवा आणि विशाल विजय खारवा अशी या तिघांची नावे असून यातील विजय हा अजीत यांचा मेहुणा आहे तर इतर दोघेही त्याचे मुले असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यानंतर ते तिघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
अजीत खारवा हे कापड व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत बोईसर येथील गणेशनगर परिसरात राहतात. विजय हा त्यांचा मेहुणा असून तो विरार येथील चंदन सर नगर, बुद्धपाडा, नवशक्ती इमारतीमध्ये राहतो. अजीत आणि विजय यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरु होता. त्यातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. गुरुवारी अजीत हा त्याचा मुलगा अभय याच्यासोबत मोबाईल खरेदीसाठी नागपाडा येथे आला होता. रात्री उशिरा तीन वाजता ते दोघेही कामाठीपुरा, बारावी गल्ली, व्हीआर तुल्ला मैदानाजवळून जात होते. यावेळी तिथे विजय हा त्याचे दोन्ही मुले विक्रम आणि विशाल यांच्यासोबत आला.
कौटुंबिक वादातून या तिघांनी खारवा पिता-पूत्रावर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हहल्ला केला होता. त्यात ते दोघेही जखमी झाले होते. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी तेथून पळून गेले होते. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच नागपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या दोघांनाही पोलिसांनी तातडीने जवळच्या नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे अभयला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर अजीत खारवा यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या पिता-पूत्रांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.