मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 मार्च 2025
मुंबई, – सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित 63 वर्षांच्या वयोवृद्ध अश्लील चाळे करुन अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी वयोवृद्धाला नागपाडा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
38 वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत नागपाडा परिसरात राहते. याच परिसरात आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. रविवारी दुपारी सव्वातीन वाजता या महिलेची सहा वर्षांची मुलगी जवळच असलेल्या एका दुकानासमोर खेळत होती. यावेळी तिथे आरोपी आला आणि त्याने तिच्या कमलेला पकडून बाजूला नेले. त्यानंतर त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. या प्रकारामुळे ती प्रचंड घाबरली आणि घरी निघून आली. घडलेला प्रकार तिने तिच्या आईला सांगितला. मुलीकडून ही माहिती समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर ती मुलीला घेऊन नागपाडा पोलीस ठाण्यात आली होती. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिने आरोपी वयोवृद्धाविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी हा याच परिसरात राहत असून भंगार गोळा करण्याचे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.