नागपाडा येथे ६५ वर्षांच्या वयोवृद्ध डॉक्टरची आत्महत्या
इमारतीच्या ४२ व्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – नागपाडा येथे एका ६५ वर्षांच्या वयोवृद्ध डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. फारुख अन्सारी असे या डॉक्टरचे नाव असून त्यांनी त्यांच्या निवासी इमारतीच्या ४२ व्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविले. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. फारुख अन्सारी यांच्या आत्महत्येने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता नागपाडा येथील ऑर्चिड एन्क्लेव्ह टॉवरमध्ये घडली. याच टॉवरमध्ये डॉ. फारुख हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होते. गेल्या दोन वर्षांपासून ते मानसिक नैराश्यात होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यातच त्यांना प्रोस्टेट कॅन्सर झाले होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे ते आणखीन नैराश्यात गेले होते. शनिवारी दुपारी ते त्यांच्या राहत्या घरी होते. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा हे दोघेही होते. तीन वाजता त्यांनी त्यांच्या घरातील बाल्कणीतून उडी घेतली होती. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच नागपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांचा मृतदेह नंतर नायर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला होता. याप्रकरणी त्यांच्या पत्नीसह मुलाची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यात डॉ. फारुख हे आजाराला कंटाळले होते. या आजारामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी ४२ व्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविले. त्यांच्या मृत्यूबाबत त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नव्हती. त्यामुळे या जबानीनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती.