चोरीच्या गुन्ह्यांत बहिणीला चोरीच्या मुद्देमालासह अटक
पैशांची गरज असल्याने बहिणीच्या घरी हातसफाई केली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 नोव्हेंबर 2025
नायगाव, – बहिणीच्या घरी चोरी करुन पळून गेलेल्या बहिणीला चोरीच्या मुद्देमालासह नायगाव पोलिसांनी कुठलाही पुरावा नसताना शिताफीने अटक केली. मनिषा ओमकार शर्मा असे या आरोपी बहिणीचे नाव असून तिच्याकडून चोरीचा संपूर्ण सहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पैशांची गरज असल्याने तिने तिच्या बहिणीकडे पैशांची मागणी केली, मात्र ती सतत दुर्लक्ष करत असल्याने तिने तिच्या घरी हातसफाई करुन गावी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता, मात्र चोरीनंतर तिला काही तासांत पोलिसांनी अटक करुन या चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली. याच गुन्ह्यांत ती सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान यांनी सांगितले.
नायगाव येथील सनटेक वर्ल्ड इमारतीच्या बी विंगच्या 1403 मध्ये विभू विजय सोनी ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहते. 11 नोव्हेंबरला तिच्यासह तिच्या मानलेल्या दोन बहिणी सोनिया आणि मनिषा जेवण करुन झोपण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी सोनिया आणि मनिषा या दोघीही हॉलमध्ये विभू ही बेडरुममध्ये झोपली होती. रात्री उशिरा मनिषाने बेडरुममध्ये प्रवेश करुन कपाटातील विविध सोन्याचे दागिने, विभू आणि सोनिया यांचे दोन्ही मोबाईल असा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. त्यानंतर ती घरातून निघून गेली होती. हा प्रकार दुसर्या दिवशी विभू सोनी हिच्या लक्षात येताच तिने नायगाव पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्याच बहिणीविरुद्ध चोरीची तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ धोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक विजय कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे, पोलीस हवालदार सचिन ओलेकर, सचिन मोहिते, अंमलदार चेतन ठाकरे, सचिन खंताळ, जयवंत खंडवी, अशोक पाटील, मसुब रुपाली आठवले यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील पन्नास ते साठ सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मनिषा शर्मा हिला वसई रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले होते.
चौकशीत तिनेच ही चोरी केल्याची कबुली दिली. तिला पैशांची प्रचंड गरज होती, त्यामुळे तिने विभू सोनीकडे पैशांची मागणी केली होती. मात्र वारंवार मागणी करुन तिने तिला आर्थिक मदत केली नाही. त्यामुळे तिने तिच्याच घरी चोरी करण्याची योजना बनविली होती. ठरल्याप्रमाणे सर्वजण जेवण झाल्यानंतर झोपण्यासाठी गेले होते. यावेळी तिने रात्री उशिरा तिच्या बेडरुममधील कपाटातील सोन्याचे दागिने आणि मोबाईल घेऊन पलायन केले होते.
चोरीनंतर ती वसई रेल्ेव स्थानकात आली होती. तेथून ती दिल्लीला जाणार होती, मात्र तिथे जाण्यापूर्वीच तिला पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर तिला लोकल कोर्टांत हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.