मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑक्टोंबर २०२४
नालासोपारा, – विविध सहा गुन्ह्यांतील सुमारे ३९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करुन तो तक्रारदारांना स्वाधीन करण्यात आला आहे. एका कार्यक्रमांत नालासोपारा पोलिसांनी हा मुद्देमाल तक्रादारांना परत करुन त्यांना दिवाळीची भेट दिली आहे. चोरीचा मुद्देमाल परत मिळाल्याने तक्रारदारांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.
नालासोपारा पोलीस ठाण्यात सहा विविध गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यात हत्येसह अपहारासह फसवणुक, घरफोडी, चोरी आदी गुन्ह्यांचा समावेश होता. या सहाही गुन्ह्यांतील आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून बहुतांश मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते. हा मुद्देमाल एका कार्यक्रमांत नालासोपारा पोलिसांकडून संंबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला आहे. त्यात ५ लाख ५ हजार ४०८ रुपयांची कॅश, एक लाख रुपयांची एक बाईक, दहा हजार रुपयांचा मोबाईल आणि २८ लाख २३ हजा ५४० रुपयांचे सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. सुमारे ३९ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत करुन पोलिसाकडून त्यांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. त्यामुळे दिवाळीच्या शुभ मूहर्तावर सामान्य नागरिकांच्या चेहर्यावर आनंद फुलला होता.
ही कामगारी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन कोतमिरे, श्याम आपेट, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चदनकर, पंडित मस्के (सध्या वालिव पोलीस ठाणे), पोलीस निरीक्षक अमोल तळेकर (नवघर पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, अख्तर शेख, सहाय्यक फौजदार निकुंभ, पोलीस हवालदार धनू, साळुंखे, पोलीस नाईक तटकरे, गलांडे, पोलीस शिपाई बाचकर, नाटुलकर, घोडेराव, जगदाळे, पोलीस हवालदार ढोणे, पोलीस शिपाई सोहेल शेख, (पोलीस उपायुक्त कार्यालय तीन-विरार) यांनी केली.