पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिवे मारण्याचा धमकीचा कॉल

मानसिक आजाराने त्रस्त महिलेस नोटीस देऊन सोडून दिले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची तयारी सुरु असून वेपन आल्याची माहिती सांगून संपूर्ण पोलीस यंत्रणेला एका महिलेने कामावर लावले. चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर ही महिला मानसिक आजाराने त्रस्त असून नैराश्यातून तिने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. कायदेशीर अटक केल्यानंतर तिला नोटीस देऊन सोडून देण्यात आले. या धमकीमागे काहीही संशयास्पद नसून मानसिक तणावातून तिने हा कॉल केला होता असे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

बुधवारी सकाळी सव्वानऊ वाजता मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एका अज्ञात महिलेचा कॉल आला होता. नरेंद्र मोदी यांना मारण्याची तयारी सुरु असून वेपन आले आहेत असे सांगून तिने फोन कट केला. त्यानंतर या मोबाईलवर पोलिसांनी कॉल केला असता तो मोबाईल बंद येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर संबंधित मोबाईल क्रमांकाची पोलिसांनी माहिती काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो कॉल अंधेरी परिसरातून आल्याचे उघडकीस आले होते. या महिलेने मोबाईल बंद ठेवल्याने तिचा शोध घेण्यास अडचणी येत होत्या. अखेर या महिलेने मोबाईल ऑन केल्यानंतर तिला आंबोली पोलिसांच्या एका विशेष पथकाने उत्तर मुंबईतून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिनेच कंट्रोल रुमला कॉल करुन नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याचा कॉल केल्याची कबुली दिली.

ही महिला मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे उघडकीस आले. अविवाहीत असलेली ही महिला एकटीच राहत असून तिची बहिण तिच्या शेजारीच परिसरात राहते. याबाबत तिच्या बहिणीला ही माहिती देण्यात आली होती. रात्री उशिरा तिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तिला कायदेशीर अटक करुन नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले. तिच्या बहिणीला योग्य ती समज देऊन तिचा ताबा तिच्याकडे सोपविण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यापूर्वीही तीन ते चार वेळा जिवे मारण्याच्या धमक्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page