नवल बजाज यांची राज्य एटीएस प्रमुखपदी नियुक्ती

बुधवारी गृहमंत्रालयाकडून नियुक्तीचे आदेश जारी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ जून २०२४
मुंबई, – राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी अखेर आयपीएस अधिकारी नवल बजाज यांची नियुक्ती करण्यात आली. सीबीआयमधून महाराष्ट्र केडरमध्ये पाठविण्यात आल्यानंतर नवल बजाज हे नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते, लोकसभा निवडणुकीमुळे त्यांची नियुक्तीचे आदेश जारी झाले नव्हते. अखेर बुधवारी गृहमंत्रालयाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून रिक्त असलेल्या एटीएस प्रमुख म्हणून नवल बजाज लवकरच आपल्या पदाची सूत्रे हाती घेणार आहे. त्यांच्या नियुक्तीने पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.

सदानंद दाते हे पूर्वी राज्य एटीएस प्रमुखपदी कार्यरत होते. २७ मार्चला त्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या जागीच कोणाचीही नियुक्ती न झाल्याने या पदाचा अतिरिक्त कार्यभार विशेष पोलीस महानिरीक्षक सी. के मीना यांच्याकडे सोपविण्यात आला होता. गेल्या अडीच महिन्यांपासून मीना या पदाच्या कार्यभार सांभाळत होत्या. दुसरीकडे नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या नवल बजाज यांची गृहमंत्रालयाने राज्य एटीएसच्या प्रमुखपदी नियुक्ती केली. याबाबतचे आदेश बुधवारी जारी करण्यात आले. १९९५ ब्रॅचचे नवल बजाज हे आयपीएस अधिकारी असून त्यांनी मुंबईसह कोकण, सीबीआय आणि इतर महत्त्वाची ठिकाणी चांगली कामगिरी केली होती. मुंबई शहरात त्यांनी पोलीस उपायुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, विशेष शाखा अतिरिक्त पोलीस आयुक्त, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, सहपोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था, राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस महासंचालक आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आदी ठिकाणी काम केले आहे. सीबीआयच्या सहसंचालक म्हणून काम करताना त्यांनी कोळसा घोटाळ्याचा तपास केला होता. त्यानंतर मे महिन्यांत त्यांना पुन्हा मूळ महाराष्ट्र केडरमध्ये पाठविण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. अखेर बुधवारी त्यांची एटीएस प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page