मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 फेब्रुवारी 2025
मुंबई, – नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोचा पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करुन दंडात्मक कारवाई करणार्या रवी इंद्रप्रसाद पांडे या 28 वर्षांच्या तोतया पोलिसाला नवघर पोलिसांनी अटक केली. तोतयागिरी करुन फसवणुक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. रस्त्यावर थुंकला म्हणून रवीने तक्रारदाराकडे 68 हजाराची मागणी करुन 40 हजार रुपये घेऊन पलायन केले होते.
यातील तक्रारदार मुलुंडचे रहिवाशी आहे. मंगळवारी ते त्यांच्या बाईकवरुन जात होते. यावेळी रस्त्यावर थुंकल्यानंतर त्यांच्याकडे एक तरुण आला. त्याने तो नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोचा पोलीस असल्याची बतावणी करुन सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने फाईन म्हणून 68 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर तो त्यांच्याकडून 40 हजार रुपये घेऊन पळून गेला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी नवघर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तोतया पोलिसाविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मदने, पोलीस निरीक्षक महेश जाधव यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अजीत पाटील, टाकसाळ, पोलीस उपनिरीक्षक दणाने, पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस शिपाई मोरे, रोकडे, महिला पोलीस शिपाई काळे, हाडवळे यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या रवी पांडे या तरुणाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीदरम्यान त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. रवी हा भांडुपचा रहिवाशी असून त्याचा स्वतचा व्यवसाय आहे. तो पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करुन दंडात्मक कारवाई करत होता. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.