मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 सप्टेंबर 2025
नवी मुंबई, – एमडी ड्रग्जची विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना कौपरखैरणे पोलिसांनी अटक केली. निखील राजकुमार वागासे आणि मसुद अब्दुल सलाम खान अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी 72 लाख रुपयांचा 182 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जसहीत साडेतेरा लाखांची एक महागडी कार असा 85 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरात एमडी ड्रग्जच्या तस्करीत प्रचंड वाढ झाल्याने अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध नवी मुंबईतील स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना घनसोली रेल्वे स्थानकाजवळ काहीजण एमडी ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे यांना मिळाली होती.
या माहितीनंतर पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल धस, कौपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे, पोलीस हवालदार सुनिल चिकणे, हणमंत किर्वे, पोलीस शिपाई मुकिंदा सोलनकर, मनोहर जाधव, राहुल डोंबाळे, निलेश निकम यांनी रेल्वे स्थानक परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.
ठरल्याप्रमाणे तिथे एका खाजगी कारने आलेल्या निखिल वागासे आणि मसुद खान या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी निखीलकडून पोलिसांनी 44 लाख रुपयांचे 112 ग्रॅम तर मसुदकडून 28 लाख रुपयांचे 69 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले. या दोघांकडून पोलिसांनी 182 ग्रॅम वजनाचे एमडी जप्त करण्यात आले असून त्याची किंमत 72 लाख रुपये इतकी आहे. या गुन्ह्यांतील साडेतेरा लाखांची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
याप्रकरणी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.