मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ मार्च २०२४
मुंबई, – बल्गेरिया देशाच्या कार्गो जहाजाचे अपहरण करुन जहाजाच्या मालकासह सतरा कर्मचार्याच्या सुटकेसाठी साठ दशदक्ष अमेरिकन डॉलरच्या खंडणीच्या मागणी केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या ३५ सोमालियन चाच्यांविरुद्ध अखेर येलोगेट पोलीस ठाण्यात भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच संबंधित सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या सर्वांना रविवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अलीकडेच भारतीय नौदलाने ऍण्टी पायरसी ऑपरेशन हाती घेऊन जहाजावरील मालकासह सर्व कर्मचार्यांची सुटका करुन आरोपी सोमालियन चाच्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर या सर्वांना पुढील कारवाईसाठी येलोगेट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
भारतीय नौदलाकडून समुद्रात चालणारे व्यापारी जहाज आणि क्रु मेंबर्स यांच्या सुरक्षेसाठी नियमित गस्त करण्यात येते. १४ डिसेंबर २०२३ ते १६ मार्च २०२४ या कालावधीत पोर्ट गाराकॅड, सोमालियापासून २६० नोटीकल मैल पूर्वेस अरबी समुद्रात एक कार्गो जहाज बल्गेरिया देशात जात होते. त्यात जहाजाच्या मालकासह १७ क्रु मेंबर्स होते. या सर्वांचे काही सोमालियन चाच्यांना अपहरण केले होते. त्यांच्याकडील घातक शस्त्रांनी जिवे मारण्याची धमकी देऊन स्वतच्या अर्थिक फायद्यासाठी जहाजाच्या मालकासह क्रु मेंबर्सच्या सुटकेसाठी ६० दशदक्ष अमेरिकन डॉलरची खंडणी स्वरुपाची मागणी केली होती. खंडणीची ही रक्कम दिली नाहीतर सर्वांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे अपहरण झालेल्या जहाजाच्या मालकासह इतर कर्मचार्याच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाने ऍण्टी पायरेसी ऑपरेशन हाती घेतले होते. यावेळी या अधिकार्यासह जवानांवर सोमालियन चाच्यांनी गोळीबार करुन त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. तसेच रेकीसाठी पाठविलेल्या नौदलाच्या नौकेवरील ड्रोनवर गोळीबार करुन नुकसान केले होते. मात्र अथक परिश्रमानंतर भारतीय नौदलाने ही कारवाई यशस्वी पूर्ण करुन जहाजावरील मालकासह क्रु मेंबर्सची सुटका करुन ३५ सोमालियन चाच्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या कारवाईत पोलिसांनी दोन पांढर्या रंगाच्या बोटी, तीन इंजिन, नऊ मोबाईल, १९६ जिवंत काडतुसे, एक खाली केस, एक सोनी कॅमेरा, एक चाकू, एक सोमालियन देशाचा पासपोर्ट, दोन बल्गेरिया पासपोर्ट, ओळखपत्रे आणि इतर कागदपत्रे जप्त केले होते. या घटनेनंतर भारतीय नौदलाचे आयएनएस कोलकाता या युद्धनौकेचे रेग्युलेटिंग अधिकारी लेफ्टनंट अजयकुमार यांनी येलोगेट पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संबंधित ३५ चाच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह खंडणीसाठी जिवे माण्याची धम्की देणे, अपहरण, सरकारी कामात अडथळा आणणे तसेच अन्य भादवीसह मेरिटाईम ऍण्टी पायरेसी, अनलॉफुल ऍक्टिव्हीटी प्रिव्हेशन आणि भारतीय हत्यार, पासपोर्ट, परकीय नागरिक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत शनिवारी संबंधित सर्व ३५ सोमालियन चाच्यांना येलोगेट पोलिसांनी अटक केली. या सर्वांना रविवारी किल्ला कोर्टात हजर करुन त्यांची जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.