नौसेनेत नोकरीच्या आमिषाने तेरा बेरोजगार तरुणांची फसवणुक
घाटकोपर येथील घटना; तीन भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ जून २०२४
मुंबई, – भारतीय नौसेनेत मोठ्या प्रमाणात नोकरी भरती सुरु असल्याची बतावणी करुन तेरा बेरोजगार तरुणांची सुमारे ३३ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन भामट्याविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला आहे. शेखर मिश्रा, राहुलकुमार सिंग आणि नितीन कश्यप अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जात असून फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दत्ताराम शंकर डिगे हे घाटकोपरच्या असल्फा व्हिलेज परिसरात राहत असून शीव येथील एका खाजगी कंपनीच्या वाहतूक जहाजांचे शिप मॅनेजमेंटमध्ये सहाय्यक म्हणून कामाला आहे. याच दरम्यान त्यांची शेखर मिश्रा या व्यक्तीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. चार वर्षांपूर्वी त्याने त्यांना फोन करुन भारतीय नौसेनेत ड्राफ्टमन व लायब्रियन म्हणून मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. त्यांचा मित्र राहुलकुमार सिंग हा नौसेनेत पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्याच्या ओळखीतून काही बेरोजगार तरुणांना कायमस्वरुपी नोकरी मिळवून देतो असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या २१ वर्षांच्या मुलीसह परिचित तरुणांना नोकरी मिळवून देण्याची विनंती केली होती. त्यानेही सर्वांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. ऑगस्ट २०२० शेखरने राहुलकुमार आणि नितीन यांच्याशी त्यांची ओळख करुन दिली होती. यावेळी त्यांनी तक्रारदाराच्या मुलीसह तेरा नातेवाईक व परिचित मुलांचे फॉर्म भरुन घेतले. नोकरीसाठी आगाऊ रक्कम भरावी लागणार असल्याने त्यांनी त्यांना ३३ लाख ३० हजार रुपये दिले होते. त्यापैकी ११ लाख २७ हजार शेखर तर २२ लाख ३ हजार राहुलकुमारच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती.
मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी कोणालाही नोकरी मिळवून दिली नाही. विचारणा केल्यानंतर ते तिघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. काही दिवसांनी या तिघांनी त्यांचे मोबाईल बंद करुन पलायन केले होते. त्यामुळे त्यांच्याशी त्यांचा कुठलाही संपर्क होऊ शकला नाही. अशा प्रकारे शेखर मिश्रा, राहुलकुमार सिंग आणि नितीन कश्यप यांनी ऑगस्ट २०२० ते एप्रिल २०२३ या कालावधीत भारतीय नौसेनेत विविध पदावर नोकरी भरती सुरु असल्याची बतावणी करुन तक्रारदाराच्या मुलीसह तेराजणांकडून नोकरीसाठी ३३ लाख ३० हजार रुपये घेतले आणि कोणालाही नोकरी न देता त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तिन्ही आरोपीविरुद्ध घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.