भारतीय नौसेनेत अधिकारी पदावर नोकरीच्या नावाने गंडा
76 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 मार्च 2025
मुंबई, – भारतीय नौसेनेत मोठ्या प्रमाणात अधिकारी पदावर भरती सुरु असल्याची बतावणी करुन गंडा घालण्यात आल्याचा प्रकार वरळीतील कोळीवाड्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरुद्ध दादर पोलिसांन अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अनुज मयेकर, नितीन शेट्ये, गणेश नगरकर अणि श्रद्धा गोठीवरेकर अशी या चौघांची नावे आहेत. त्यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या टोळीने आतापर्यंत पंधराजणांची सुमारे 76 लाख रुपयांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही तरुणांना नोकरीच्या नावाने गंडा घातला आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. या आरोपींकडून फसवणुक झालेल्या लोकांनी दादर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आला आहे.
मयुर मंगेश दळवी हे 28 वर्षांचे तक्रारदार वरळीतील कोळीवाडा, जनता कॉलनीतील नवतरुण रहिवाशी संघात राहतात. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत त्यांची आरोपींशी ओळख झाली होती. त्यांनी त्यांना भारतीय नौसेनेत अधिकारी पदासाठी मोठ्या प्रमाणात नोकरी भरती सुरु आहे. त्यांना नौसेनेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन मयुर दळवी यांना इतर काही उमेदवार इच्छुक आहेत का याबाबत विचारणा केली होती. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या मित्रांनी, नातेवाईकांनी नोकरीसाठी त्यांच्याकडे विचारणा केली होती. मयुर दळवीसह इतर पंधराजणांनी नोकरीसाठी इच्छुक असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून 76 लाख रुपये घेतले होते. त्यापैकी साठ लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आले तर सोळा लाख कॅश स्वरुपात देण्यात आले होते.
हा संपूर्घ व्यवहार 5 डिसेंबर 2024 ते 13 फेब्रुवारी 2025 या कालावधीत वरळीतील कोळीवाड्यात झाला होता. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी कोणालाही नोकरी लावली नाही किंवा नोकरीचे नियुक्तीपत्र दिले नव्हते. विचारणा केल्यानंतर ते चौघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. विविध कारण सांगून त्यांच्या कॉलला प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्यांनी नौसेनेतील नोकरीचा विचार सोडून त्यांच्याकडे नोकरीसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र आश्वासन देऊन त्यांनी त्यांचे पैसे परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच मयुर दळवीसह इतरांनी दादर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अनुज मयेकर, नितीन शेट्ये, गणेश नगरकर आणि श्रद्धा गोठीवरेकर या चौघांविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या चौघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.