नौदलाच्या दोन्ही अधिकार्यांसह पाचजणांच्या कोठडीत वाढ
टुरिस्ट व्हिसावर दक्षिण कोरियाला मानवी तस्करीप्रकरण
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ जुलै २०२४
मुंबई, – बोगस कागदत्रांच्या दक्षिण कोरियात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना टुरिस्ट व्हिसा देऊन लाखो रुपये उकाळणार्या टोळीशी संबंधित असलेल्या दोन नौदलाच्या अधिकार्यांसह पाचजणांच्या पोलीस कोठडीत शुक्रवारी किल्ला कोर्टाने ९ जुलैपर्यंत वाढ केली आहे. विपीन सुरेशकुमार डागर, ब्राहम ज्योती बिषण दास, सिमरन सोमनाथ तेजी, दिपक मोहिंदरलाल मेहरा आणि रविकुमार थोडूराम अशी या पाचजणांची नावे असून यातील बा्रहम दास आणि विपीन डागर हे नौदलाचे अधिकारी आहेत. या आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना कडेकोट पोलीस बंदोबस्त शुक्रवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
बोगस कागदपत्रांच्या आधारे काही उमेदवारांना दक्षिण कोरियाला टुरिस्ट व्हिसावर पाठविणारी एक टोळी कार्यरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. या टोळीने टुरिस्ट व्हिसासह इतर बोगस दस्तावेज बनविण्यासाठी संबंधित उमेदवाराकडून दहा ते पंधरा लाख रुपये घेतले होते. तसेच या संपूर्ण कटात काही नौदल अधिकार्यांचा सहभाग असल्याचे समजले होते. या माहितीनंतर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध फसवणुकीसह भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे देण्यात आला होता. याच गुन्ह्यांत २८ जूनला विपीन डागर आणि रविकुमार या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर २९ जूनला ब्राहम दास, ३० जून त्याची सहकारी सिमरन आणि जम्मूहून पासपोर्ट एजंट दिपक मेहरा या तिघांना अटक करण्यात आली होती. ते पाचही आरोपी सध्या पोलीस कोठडीत होते. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना शुक्रवारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.
रविकुमारच्या चौकशीत त्याला दक्षिण कोरियाचा पासपोर्ट दिपकने तर दिपकला ब्राहम ज्योती व विपीनने दिल्याचे उघडकीस आले होते. या आरोपींनी रविकुमारला बोगस दस्तावेज म्हणून लेटरहेड आणि स्ॅटम्पद्वारे व्हिसासाठी एनओसी मिळवून दिली होती. विपीनकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपवरुन पोलिसांना महत्त्वाचे पुरावे प्राप्त झाले आहेत. दिपक, ब्राहम यांनी विदेशात जाणार्या जम्मूच्या अनेक तरुणांकडून नोकरीसाठी व्हिसा मिळवून त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतली होती. ही रक्कम विपीन, सिमरन यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. या सर्वांच्या बँक खात्याची माहिती काढल्यानंतर त्यात लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून आले आहे. विपीनने स्टॅम्प बनविण्याचे मशिन विशाखापट्टणम येथून विकत घेऊन त्याच्या बँक खात्यातून मशिनसह स्टॅम्पसाठी पेमेंट केले होते. विदेशात नोकरीसाठी बोगस कागदपत्रांसह व्हिसा देणारी ही एक टोळी असून ब्राहम ज्योती या टोळीचा म्होरक्या आहे. त्याने त्याच्या मोबाईलमधील सर्व डाटा डिलीट केला आहे. हा डाटा परत मिळविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. त्याने पाच ई-मेल आयडी बनविले होते. ब्राहमने पैशांच्या व्यवहारासाठी सिमरनची मदत घेतली होती. तिने बँकेत खाती उघडून तिच्या बँक खात्याचा वापर तो स्वत करत होता. दिपक मेहरा हा व्हिसा मिळवून देणारा एजंट असून त्याने दिलेले व्हिसा विपीन आणि ब्राहम यांच्याकडे पाठविण्यात येत होते. या टोळीने आतापर्यंत दक्षिण कोरियामध्ये किती लोकांना पाठविले आहे. त्यांचे विमान तिकिट कोणी काढले होते, प्रत्येक उमेदवाराकडून त्यांनी किती रुपये घेतले, या पैशांची विल्हेवाट त्यांनी कशी लावली याचा आत पोलीस तपास करत आहेत.