आंतरराज्य ड्रग्ज तस्करीचा एनसीबीकडून पर्दाफाश

७५ किलो गांजासह कोडीन सिरपचा साठा जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० ऑगस्ट २०२४
मुंबई, – उल्हासनगर येथून इतर ठिकाणी ड्रग्ज पुरविणार्‍या एका आंतरराज्य ड्रग्ज तस्करीचा मुंबई युनिटच्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत सहा आरोपींना या अधिकार्‍यांनी अटक केली असून त्यांच्याकडून ७५ किलो गांजासह चार हजार आठशे कोडीन सिरप साठा जप्त करण्यात आला आहे.

ड्रग्ज तस्करी करणारी ही आंतरराज्य टोळी असून उल्हासनगर येथून या टोळीच्या कारवाया सुरु असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर सहाही आरोपींना लोकल कोर्टाने एनसीबी कोठडी सुनावली आहे. इतर राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज उल्हासनगर येथून आणून नंतर या ड्रग्जची इतरत्र विक्री करणारी एक आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची माहिती मुंबई युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची अतिरिक्त संचालक अमीत घावटे यांनी गंभीर दखल एनसीबीच्या अधिकार्‍यांना कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर या पथकाने गुरुवारी उल्हासनगर येथील एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयाजवळ साध्या वेशात पाळत ठेवून चार हजार आठशे कोडीन सिरपच्या बाटल्या जप्त केल्या. या सिरपचा नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. याच कारवाईत विनोद पी या आरोपीस अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीनंतर या अधिकार्‍यांनी मनिष पी, आकाश पी, सनी जे, राज के आणि मोहनीस एस या अन्य पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून या अधिकार्‍यांनी एक ट्रॅव्हेल्स व ट्रॉली बॅग आणि गोणी जप्त केल्या. या गोणीमध्ये त्यांनी ७५ किलो गांजा ठेवला होता. त्यापैकी काही गांजाची या टोळीने विक्री केली होती. त्यातून त्यांना एक लाख अठरा हजार आठशेसाठ रुपये मिळाले होते. या गांजासह कॅश या अधिकार्‍यांनी जप्त केली आहे. याच गुन्ह्यांत सहाही आरोपी अटक करुन लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना एनसीबी कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page