मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 एप्रिल 2025
मुंबई, – एनईएफटीद्वारे पेसे पाठविल्याचे भासवून कारचा अपहार करुन पळून गेलेल्या दोन भामट्यांना बोरिवली पोलिसांनी अटक केली. ओंकार हनुमंत शिंदे आणि सौरभ हनुमंत मोहिते अशी दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली होती.
विनित दिपक शाह हा तरुण बोरिवली परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. 2018 साली त्यांच्या वडिलांनी टोयोटो कंपनीची एक कार सेकंडहॅण्डमध्ये विकत घेतली होती. या कारचा ते स्वत वापर करत होते. सात वर्षांनंतर त्यांना नवीन कार घ्यायची होती, त्यामुळे त्यांनी जुनी कार विक्रीसाठी सोशल मिडीयावर जाहिरात दिली होती. ही जाहिरात पाहून त्याला ओंकार नावाच्या एका तरुणाने कॉ केला. ती कार खरेदी करण्यास आपण इच्छुक असल्याचे सांगून तो कार पाहण्याासाठी 10 फेब्रुवारीला त्यांच्या घराजवळ आला होता.
ठरल्याप्रमाणे ओंकार त्याच्या एका मित्रासोबत आला होता. तो त्याचा मावस भाऊ असल्याचे सांगून त्याने कारची पाहणी केली. त्यानंतर त्याने टेस्टड्राईव्हसाठी ती कार घेतली होती. टेस्टड्राईव्हनंतर त्याने ती कार घेण्यास आपण इच्छुक असल्याचे सांगितले. चर्चेअंती त्यांच्यात 6 लाख 30 हजारामध्ये कारचा व्यवहार झाला होता. काही वेळानंतर त्याने त्याच्या बँक खात्यातून त्याच्या खात्यात एनईएफटीद्वारे पैसे ट्रान्स्फर केल्याचे दाखविले. या पेमेंटची पावती त्याने त्याला पाठविली होती. दोन तासांत त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल असे सांगून त्याने त्याला स्वतचे आधारकार्ड, पॅनकार्ड दिले. तसेच कार ट्रान्स्फर करण्याच्या कागदपत्रावर त्याच्या वडिलांची सही घेतली होती. त्यानंतर तो कार घेऊन निघून गेला होता.
दोन तासांनी विनित शाहने बँकेचे स्टेटमेंट पाहिले असता खात्यात ही रक्कम जमा झाली नव्हती. त्यामुळे त्याने ओंकारला कॉल करुन पैसे जमा झाले नसल्याचे सांगितले. यावेळी त्याने ट्रान्जेक्शन फेल झाले असून तुमच्या खात्यात पुन्हा पाठवितो असे सांगितले. मात्र त्याने पैसे पाठविले नाही. वारंवार विचारणा करुनही त्याचा संपर्क होऊ शकला नाही.
एनईएफटीद्वारे पैसे पाठविल्याचे भासवून तो कार घेऊन पळून गेल्याची खात्री होताच विनित शाहने बोरिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून ओंकारसह त्याच्या मावस भावाविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमाहीम सुरु असतानाच ओंकार शिंदे आणि सौरभ मोहिते या दोघांना अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी अपहार केलेली कार जप्त केली आहे.