मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बोगस भारतीय पासपोर्टवर पोलंडला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या लोबसांग देशी दोलोबसांग येश या नेपाळी महिलेस इमिग्रेशन अधिकार्यांनी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. तिच्याविरुद्ध फसवुणकीच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंगळवारी २ ऑक्टोंबरला पहाटे तीन वाजता लोबसांग ही महिला इमिग्रेशनसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. तिने तिचे पासपोर्ट, बोर्डिंग पास आणि तिकिट सादर केले होते. ही महिला पोलंडला जाणार होती. तिच्या पासपोर्टची पाहणी केली असता तिला ते पासपोर्ट बंगलोरहून जारी करण्यात आले होते. ही महिला तिबेटीयन नागरिक असल्याचा संशय आल्याने तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. तिच्याकडे चौकशी केली असता तिने ती तिबेटीयन नागरिक असल्याचे सांगितले. अठरा वर्षांपूर्वी ती तिबेट देशातून भारतात आली होती. तेव्हापासून ती कर्नाटक राज्यात वास्तव्यास होती. तिने तिबेटीयन नागरिक म्हणून कर्नाटकच्या म्हैसूर शहरात तिबेटीयन सेंटलमेंट कार्यालयात रजिस्ट्रेशन केले होते. त्यानंतर तिने तिचे रजिस्ट्रेशन वाढवून घेतले होते. गेल्या वर्षी तिने बंगलोर शहरातून बोगस भारतीय दस्तावेज बनवून पासपोर्टसाठी अर्ज केला होता. त्यानंतर तिला पासपोर्ट मिळाला होता.
याच पासपोर्टवर ती पोलंडला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. मात्र तिचे बिंग फुटले आणि तिला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सहार पोलिसाकडे सोपविले होते. बोगस दस्तावेजाच्या मदतीने भारतीय पासपोर्ट मिळवून शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत नंतर तिला सहार पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. तिला बोगस भारतीय दस्तावेज कोणी बनवून दिले, पासपोर्टसाठी कोणी मदत केली याचा आता पोलीस तपास करत आहेत.