तीन वर्षांपूर्वी झालेल्या नेव्हल डॉकयार्ड स्फोटप्रकरणी गुन्हा दाखल
स्फोटात तीन जवानांचा मृत्यू तर अकरा जवान जखमी झाले होते
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मार्च 2025
मुंबई, – तीन वर्षांपूर्वी कुलाबा येथील नेव्हल डॉकयार्ड येथे झालेल्या स्फोटप्रकरणी कुलाबा पोलिसांनी एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यासह इतर कर्मचार्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत संबंधित अधिकार्यासह कर्मचार्यांना लवकरच चौकशीसाठी समन्स पाठविले जाणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
सचिनकुमार हे नौसेनेत लेफ्टनंट कमांडर म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते कुलाबा येथील नोफ्रा नेव्हीनगर, अधिकारी वसाहतीत राहतात. कुलाबा येथील नेव्हल डॉकयॉर्ड येथे त्यांची नेमणूक आहे. 18 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी अजय एअर प्रोडेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने फ्रिऑन आर22 ग्रॅसऐवजी आर 152ए या गॅसचा पुरवठा करुन निष्काळजीसह हलगर्जीपणा केला होता. त्यामुळे नेव्हल डॉकयॉर्ड येथे मोठा स्फोट होऊन त्यात नेव्हीच्या तीन जवानांचा मृत्यू झाला तर अकरा जवान जखमी झाले होते. या स्फोटामुळे युद्धनौका आयएनएस रणवीरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या स्फोटाची नेव्हीच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. त्याची विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
या चौकशीदरम्यान स्फोटाला अजय एअर प्रोडेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचे उघडकीस आले होते. त्यांच्याच हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे हा स्फोट झाला होता. त्यामुळे या कंपनीविरुद्ध तीन वर्षांनी सचिनकुमार यांच्याकडून नेव्हीच्या वतीने कुलाबा पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अजय एअर प्रोडेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचार्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.