अंधेरी येथे नवजात अर्भकाला टाकून अज्ञात व्यक्तीचे पलायन
दोन दिवसांच्या अर्भकावर ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० एप्रिल २०२४
मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) – स्त्री जातीच्या दोन दिवसांच्या नवजात अर्भकाला रस्त्यावर टाकून अज्ञात व्यक्तीने पलायन केल्याची धक्कादायक घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. या अर्भकाला जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अर्भकाचा त्याग करुन पळून गेलेल्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संजय नागनाथ मुद्राळे हे वर्सोवा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कामाला आहेत. शनिवारी ते त्यांचे सहकारी पोलीस शिपाई पवार यांच्यासोबत परिसरात गस्त घालत होते. यावेळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला प्रदीपकुमार यादव या व्यक्तीने कॉल करुन अंधेरीतील लोखंडवाला, बॅक रोडवर एक नवजात अर्भक सापडले असून पोलीस मदत हवी आहे अशी माहिती दिली. या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्यासह संबंधित पोलीस पथक तिथे रवाना झाले. घटनास्थळी गेल्यानंतर प्रदीपकुमार यादव नावाच्या व्यक्तीने त्याने पोलिसांना कॉल केल्याचे सांगून तिथे एक नवजात अर्भक पडल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी तिथे एक स्त्री जातीच्या दोन दिवसांच्या नवजात अर्भकाला सापडले. ताब्यात घेतले. या अर्भकाबाबत आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता त्याच्याविषयी कोणालाही काहीच माहिती नव्हते. ते अर्भक जिवंत असल्याने तिला तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. मुलीचा जन्म लपविण्याच्या उद्देशाने तिच्या पालकांनी तिचा त्याग करुन तिला रस्त्याच्या कडेला टाकून पलायन केले होते. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.