न्यू इंडिया बँक घोटाळ्याप्रकरणी हॉटेल व्यावसायिकाला अटक
मार्केटमध्ये पैसे लावून 50 टक्के कमिशन देण्याचे ठरले होते
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 मार्च 2025
मुंबई, – न्यू इंडिया सहकारी बँकेत झालेल्या 122 कोटीच्या गैरव्यवहारप्रकरणी आठव्या आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. राजीवरंजन रमेशचंद्र पांडे ऊर्फ पवन गुप्ता असे या आरोपीचे नाव असून तो झारखंडचा हॉटेल व्यावसायिक आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने शुक्रवार 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजीव रंजनला या कटाचा मुख्य आरोपी हितेश मेहता आणि उल्हानाथन मारुतुवार यांनी पंधरा कोटी मार्केटमध्ये लावण्यासाठी दिले होते. त्यामोबदल्यात तो त्यांना 50 टक्के कमिशन मिळवून देणार होता असे तपासात उघडकीस आले आहे.
न्यू इंडिया सहकारी बँक लिमिटेड बँकेच्या महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना हितेश मेहता याने 1 जानेवारी 2020 ते 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीत बँकेच्या सुमारे 122 कोटीचा अपहार केला होता. ही कॅश त्याने गोरेगाव आणि प्रभादेवी येथील शाखेकडून घेतली होती. हा प्रकार नंतर उघडकीस येताच बँकेच्या वतीने देवर्षि शिरीरकुमार घोष यांनी दादर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच 15 फेब्रुवारी 2025 रोजी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश प्रविणचंद्र मेहता, 16 फेब्रुवारीला विकासक धर्मेश जयंतीलाल पौन, 20 फेब्रुवारीला बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू सुरेंदरकुमार भोन, 27 फेब्रुवारीला मनोहर अरुणाचलम मारुतुवार, 15 मार्चला शासकीय कॉन्ट्रक्टर कपिल कल्याणजी देढिया, 16 मार्चला उल्हानाथन अरुणाचलम मारुतुवार ऊर्फ अरुणभाई आणि 17 मार्चला व्यावसायिक जावेद इक्बाल आजम मोहम्मद फारुख आजम अशा अशा सातजणांना पोलिसांनी अटक केली होती.
त्यापैकी हितेश मेहता, धर्मेश पौन, अभिमन्यू भोन आणि मनोहर मारुतुवार असे चौघेही न्यायालयीन तर कपिल देढिया, उल्हानाथन मारुतुवार आणि जावेद इक्बाल आजम हे सोमवार 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीत राजीवरंजन पांडे यांचे नाव समोर आले होते. तो मूळचा झारखंडच्या बोकोरा स्टिल सिटी, बारी सहकारी सोसायटीचा रहिवाशी आहे. हितेश आणि उल्हानाथन यांनी राजीव रंजनच्या मदतीने न्यू इंडिया बँक घोटाळ्यातील रक्कम मार्केटमध्ये लावून त्याद्वारे नफा कमविण्याचा कट रचला होता. ठरल्याप्रमाणे ते दोघेही त्याला पैसे देतील आणि तो ती रक्कम सीएसआर फंड उपलब्ध असलेल्या कंपनीला देऊन रोख रक्कमेच्या बदल्यात सुमारे 50 टक्के जास्त रककम त्यांना मिळवून देणार होता. त्यानंतर त्यांनी राजीव रंजनला पंधरा कोटी रुपये दिले होते. या गुन्ह्यांत तो लाभार्थी असून त्याचा या गुन्ह्यांत सक्रिय सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
तपासादरम्यान राजीव रंजन हा झारखंडचा रहिवाशी असून हॉटेल व्यावसायिक म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेची एक टिम झारखंडला रवाना झाली होती. या पथकाने त्याला त्याच्या राहत्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्याने आरडाओरड करुन पोलिसांच्या हताावर तुरी देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पळून गेलेल्या राजीव रंजनला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने हितेश आणि उल्हानाथन यांच्याकडून पंधरा कोटी मिळाल्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला शुक्रवार 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने पंधरा कोटीची कशा प्रकारे विल्हेवाट लावली याचा पोलीस तपास करत आहेत. या गुन्ह्यांत हिरेन रणजीत भानू, त्याची पत्नी गौरी हिरेन भानूसह इतर आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यातील भानू पती-पत्नी बँकेत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदावर काम करत होते.