मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 मार्च 2025
मुंबई, – न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटीच्या गैरव्यवहारप्रकरणी एका मुख्य वॉण्टेड आरोपीस शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. अरुणाचलम उल्लाहनाथन मारुथुवर ऊर्फ अरुणभाई असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल होताच अरुणभाई हा अटकेच्या भीतीने पळून गेला होता. मात्र त्याला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.
न्यू इंडिया सहकारी बँक लिमिटेड बँकेच्या महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना हितेश मेहता याने 1 जानेवारी 2020 ते 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीत बँकेच्या सुमारे 122 कोटीचा अपहार केला होता. ही कॅश त्याने गोरेगाव आणि प्रभादेवी येथील शाखेकडून घेतली होती. हा प्रकार नंतर उघडकीस येताच बँकेच्या वतीने देवर्षि शिरीरकुमार घोष यांनी दादर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच आतापर्यंत पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात बँकेचा महाव्यवस्थापक हितेश प्रविणचंद्र मेहता, विकासक धर्मेश जयंतीलाल पौन, बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू सुरेंदरकुमार भोन, मनोहर उन्ननाथन अरुणाचलम आणि शासकीय कॉन्ट्रक्टर कपिल देढिया यांचा समावेश आहे.
यातील कपिल वगळता इतर चारही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याच गुन्ह्यांत अरुणभाई याला वॉण्टेड आरोपी घोषित करण्यात आले होते. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. मुंबईसह देशभरातील विविध राज्यात त्याचा शोध घेतला जात होता. मात्र प्रत्येक वेळेस तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. ही शोधमोहीम ुसरु असातना त्याने रविवारी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर मुख्य आरोपी हितेश मेहता याच्याकडून तीस कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. तो हितेशचा अत्यंत जवळचा सहकारी म्हणून ओळखला जात असून त्याच्या अटकेने या गुन्ह्यांतील अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.
अरुणभाईला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी त्याचा मुलगा मनोहर अरुणाचलम मारुथुवरला यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. मुलाच्या अटकेनंतरच त्याने आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला होता. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्या अटकेने या संपूर्ण प्रकरणातील मनी लॉड्रिंग कनेक्शनचा पोलिसांनी शोध सुरु केला असून त्याने आतापर्यंत कोणाला पैसे दिले, कोणाकडून पैसे घेतले याचा तपास सुरु केला आहे. अरुणभाई हा कॉन्ट्रक्टर म्हणून परिचित असून त्याची 2013 साली हितेश मेहताशी भेट झाली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो मुंबईतून गुजरात, राजस्थान व नंतर आंधप्रदेशात पळून गेला.
अटकेच्या भीतीने तो कन्याकुमारी येथे लपवून बसला होता. आत्मसमर्पण करण्यासाठी तो कन्याकुमारी-पुणेमार्ग मुंबईत आला होता. टॅक्सीतून आर्थिक गुन्हे शाखेत आल्यानंतर त्याने आत्मसमर्पण केले होते. मे 2019 रोजी त्याला हितेशने 33 कोटी आणि नंतर सात कोटी रुपये दिले होते. अशा प्रकारे त्याला हितेशकडून 40 कोटी रुपये मिळाले होते. त्यापैकी बारा कोटी त्याने त्याच्या मुलाच्या बँक खात्यात तसेच राजेश आणि निधी पवन यांना दिल्याचे उघडकीस आले आहे. हा आर्थिक व्यवहार उघडकीस आल्यानतर त्याच्यासह त्याच्या मुलाचे विविध बँकेतून सर्व बँक खाती पोलिसांनी गोठवली होती.