न्यू इंडिया बँक फसवणुकीप्रकरणी सातव्या आरोपीस अटक
घोटाळ्यातील अठरा कोटी व्यवसायात गुंतविल्याचे उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 मार्च 2025
मुंबई, – न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटीच्या गैरव्यवहारप्रकरणी सातव्या आरोपीस सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकार्यांनी अटक केली. जावेद आझम असे या 48 वर्षीय आरोपी व्यावसायिकाचे नाव असून घोटाळ्यातील सुमारे अठरा कोटी त्याने त्याच्या व्यवसायात गुंतविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टाने सोमवारी 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या चौकशीतून जावेद आझमचे नाव आले होते. तो राज्यातील एका भाजपा नेत्याचा भाऊ असल्याचे बोलले जाते.
न्यू इंडिया सहकारी बँक लिमिटेड बँकेच्या महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना हितेश मेहता याने 1 जानेवारी 2020 ते 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीत बँकेच्या सुमारे 122 कोटीचा अपहार केला होता. ही कॅश त्याने गोरेगाव आणि प्रभादेवी येथील शाखेकडून घेतली होती. हा प्रकार नंतर उघडकीस येताच बँकेच्या वतीने देवर्षि शिरीरकुमार घोष यांनी दादर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच आतापर्यंत सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात बँकेचा महाव्यवस्थापक हितेश प्रविणचंद्र मेहता, विकासक धर्मेश जयंतीलाल पौन, बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू सुरेंदरकुमार भोन, अरुणाचलम उल्लाहनाथन मारुथुवर ऊर्फ अरुणभाई, त्याचा मुलगा मनोहर उन्ननाथन अरुणाचलम आणि शासकीय कॉन्ट्रक्टर कपिल देढिया या सहाजणांचा समावेश आहे.
यातील अरुणाचलम आणि कपिल हे दोघेही पोलीस तर इतर सहा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीदरम्यान जावेद आझम याचे नाव समोर आले होते. हितेशने अरुणाचालक आणि त्याचा मुलगा उन्नानाथन यांना 38 कोटी रुपये दिले होते. त्यातील 18 कोटी त्यांनी जावेद आझमला त्याच्या व्यवसायासाठी दिले होते. जावेद हा कांदिवलीतील रहिवाशी असून तो इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक झाल्याचे समजताच तो पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. अखेर त्याला एक महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत बॅकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानू आणि त्यांची पत्नी व बँकेचा उपाध्याक्षासह इतर आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.