न्यू इंडिया बँक गैरव्यवहारप्रकरणी चौथ्या आरोपीस अटक
वॉण्टेड अरुणभाई याला पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 फेब्रुवारी 2025
मुंबई, – सुमारे 122 कोटीच्या न्यू इंडिया सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात चौथ्या आरोपीस गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. मनोहर उन्ननाथन अरुणाचलम असे या आरोपीचे नाव असून तो या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी उन्ननाथन अरुणाचलम ऊर्फ अरुणभाई यांचा मुलगा आहे. हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर त्याने त्याच्या वडिलांना पळून जाण्यात मदत केल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर त्याच्यावर अटकेची करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश प्रविणचंद्र मेहता, विकासक धर्मेश जयंतीलाल पौन आणि बँकेचा माजी सीईओ अभिमन्य सुरेंदरकुमार भोन यांना अटक केली आहे.
न्यू इंडिया सहकारी बँक लिमिटेड बँकेच्या महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना हितेश मेहता याने 1 जानेवारी 2020 ते 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीत बँकेच्या सुमारे 122 कोटीचा अपहार केला होता. ही कॅश त्याने गोरेगाव आणि प्रभादेवी येथील शाखेकडून घेतली होती. हा प्रकार नंतर उघडकीस येताच बँकेच्या वतीने देवर्षि शिरीरकुमार घोष यांनी दादर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच बँकेचा महाव्यवस्थापक हितेश प्रविण मेहता, विकासक धर्मेश जयंतीलाल पौन आणि बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू भोन या तिघांना पोलिसांनी अटक केली होती.
यातील हितेश आणि धर्मेश हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तर अभिमन्यची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला शुक्रवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला मंगळवार 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्हयांत उन्ननाथन अरुणाचलम ऊर्फ अरुणभाई हा फरार असून त्याचा मनोहर हा मुलगा आहे. त्याने त्याच्या वडिलांना पळून जाण्यात मदत केली होती. तपासात ही बाब उघडकीस येताच त्याला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी किल्ला कोर्टात हजर केले असता त्याला कोर्टाने 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे मंगळवारी मनोहर आणि अभिमन्यू या दोघांनाही पुन्हा न्यायायालयात हजर केले जाणार आहे.