मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 मे 2025
मुंबई, – न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटीच्या गैरव्यवहारप्रकरणी दहाहजणाविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी मंगळवारी किल्ला न्यायालयात 12 हजार 634 पानाचे आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रात दोघांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले असून त्यात बँकेचे माजी उपाध्याय हिरेन भानू आणि त्यांची पत्नी गौरी हिरेन भानू यांचा समावेश आहे. इतर आठ आरोपींमध्ये बँकेचा महाव्यवस्थापक हितेश प्रविणचंद्र मेहता, विकासक धर्मेश जयंतीलाल पौन, बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू सुरेंदरकुमार भोन, मनोहर अरुणाचलम मारुतुवार, शासकीय कॉन्ट्रक्टर कपिल कल्याणजी देढिया, उल्हानाथन अरुणाचलम मारुतुवार ऊर्फ अरुणभाई, व्यावसायिक जावेद इक्बाल आजम मोहम्मद फारुख आजम, हॉटेल व्यावसायिक राजीवरंजन रमेशचंद्र पांडे ऊर्फ पवन गुप्ता यांचा समावेश आहे.
देवार्षि शिशीरकुमार घोष हे वरळी परिसरात राहत असून न्यू इंडिया सहकारी बँकेत अॅक्टिंग चिफ, अकाऊटींग अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. याच बँकेत हितेश मेहता हा महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. 1 जानेवारी 2020 ते 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना हितेशने बँकेतील 122 कोटीचा अपहार केला होता. गोरेगाव आणि प्रभादेवी येथील तिजोरीतून या रक्कमेचा अपहार करुन त्याने त्याच्या कुटुंबियासह नातेवाईकांच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली होती. हा प्रकार ऑडिटदरम्यान उघडकीस बँकेच्या वतीने दादर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच हितेश मेहतासह इतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हितेश मेहतासह आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. याच गुन्ह्यांत आठही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच या आरोपींना मदत केल्याप्रकरणी बँकेचे माजी उपाध्याक्ष असलेले हितेन आणि त्यांची पत्नी गौरी भानू यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. या दोघांसहीत इतर सहा आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यात राजस्थानचे अजयसिंग राठोड, झारखंडचा पवन जयस्वाल, कर्नाटकचे शौकत जमादार, संजय राणे अॅण्ड असोशिएट्सचे अभिजीत देशमुख, शिंदे नायक अॅण्ड असोसिएट्सचे लक्ष्मीनारायण नायक, आणि एसआय मोगल अॅण्ड कंपनीचे सुभाष मोगल यांचा समावेश आहे.
या गुन्ह्यांतील आठ आरोपीसह भानू पती-पत्नी अशा दहाजणांविरुद्ध मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी आरोपपत्र सादर केले आहेत. त्यांच्याविरुद्ध बोगस दस्तावेज तयार करणे, बँकेच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक करणे, गुन्हेगारी कट रचणे आदी कलमांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यात 45 साक्षीदारांची जबानी नोंदविण्यात आली असून 55 ठिकाणी पंचनामे केल्याची नोंद आहे. या गुन्ह्यांत पोलिसांनी आतापर्यंत 167 कोटीची प्रॉपटी जप्त केली आहे. या संपूर्ण कटात हितेश मेहता हा मुख्य आरोपी असून त्याने बँकेत गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. बँकेच्या पैशांचा अपहार करुन त्याने अभिमन्यू भोन आणि उल्हानाथन मारुतुवार यांना गुंतवणुकीसाठी दिल्याचा आरोप आहे.
याच प्रकरणात हितेश मेहताची पोलिसांकडून लाय डिटेक्टरसह ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात कोट्यवधी रुपयांचे मनी लॉड्रिंग झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याचा स्वतंत्र तपास ईडीने सुरु केला आहे. याच चौकशीतून हिरेन भानू यांनी विदेशात 45 कोटी विविध संस्थामध्ये ट्रान्स्फर केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान आरोपपत्र सादर करण्यात आलेल्या या दहाही आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.