बीएनएस-बीएनएसएस-बीएसए कायद्यांची अंमलबजावणी सुरु
पहिल्याच दिवशी राज्यात ७३ तर मुंबईत २३ गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ जुलै २०२४
मुंबई, – संपूर्ण देशात आजपासून नवीन भारतीय न्याय संहितातर्ंगत (बीएनएस-बीएनएसएस-बीएसए ) गुन्ह्यांची अंमलबजावणी सुरु झाली असून पहिल्याच दिवशी राज्यात ७३ तर मुंबई शहरात सायंकाळपर्यंत २३ हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मुंबईत पहिला गुन्हा डी. बी मार्ग पोलीस ठाण्यात नोंद झाला. कर्जाचे आमिष दाखवून एका व्यक्तीची अज्ञात सायबर ठगाने सुमारे ७३ लाखांची ऑनलाईन फसवणुक केली होती. त्यानंतर विविध पोलीस ठाण्यात अन्य काही गुन्ह्यांची नोंद झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
भारतात ब्रिटीशकालिन भारतीय दंड सहिता १८६० भादवी, फौजदारी प्रक्रिया सहिता १९७३ सीआरपीसी आणि भारतीय साक्षीपुरावा अधिनियम १८७२ आदी कायदे अस्तिस्तात होते. या कायद्याच्या जागी आता एक जुलैपासून बीएनएस-बीएनएसएस-बीएसए या नवीन कायदा कलमांतर्गत गुन्हे दाखल होणार आहे. आता भादवी, फौजदारी प्रक्रिया सहिता आणि भारतीय साक्षीपुरावा अधिनियमऐवजी भारतीय न्यास सहिता, भारतीय नागरिक सुरक्षा सहिता आणि भारतीय साक्ष सहिता असे तीन नवीन कायदे अंमलात आले आहे. या कायद्यांतर्गत पहिला गुन्हा डी. बी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. मूळचे मध्यप्रदेशचे रहिवाशी असलेले दिलीप सुभेदार सिंह हे गिरगाव येथील भेल प्लाझा परिसरात राहत असून आचारी म्हणून काम करतात. २६ जूनला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो बजाज फिनसर्व्ह कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांना कर्जाची आवश्यकता असल्याचे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कर्जाच्या नावाने त्यांच्याकडून ७३ हजाराची ऑनलाईन फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच दिलीप सिंह यांनी दुपारी डी. बी मार्ग पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ३१८ (४), ३१९ (सी) भारती न्याय संहिता २०२३ सहकलम ६६ (क), ६६ (ड) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नवीन बीएनएस कायद्यांतर्गत झालेला हा पहिला गुन्हा ठरला आहे. त्यानंतर मुंबई शहरात सायंकाळी वाजेपर्यंत विविध पोलीस ठाण्यात २३ तर राज्यात ७३ गुन्ह्यांची हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली होती. मुंबई पोलिसांनी जास्तीत जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना नवीन गुन्हेगारी कायद्यांबाबत संपूर्ण प्रशिक्षण दिले होते. त्यासाठी सर्व प्रादेशिक आणि क्षेत्रीय कार्यालयांना तीन नवीन कायद्यांचे प्रशिक्षण साहित्य देण्यात आले होते. त्यामुळे आता सर्व पोलीस ठाण्यात नवीन फौजदारी कायद्यांतर्गत योग्य दुरुस्त्या आणि तरतुदी रजिस्ट्रेरसह अद्यावत केले जाणार आहे. तसेच नवीन आणि जुने कायद्यांचे तुलनात्मक तक्ते तयार संदर्भासाठी दिले आहेत. नवीन गुन्हेगारी कायदे, नवीन कायद्यांतर्गत महिला आणि बालकांविरुद्ध गुन्ह्यांच्या तरतुदीसाठी समाजातील विविध घटकांतील सामन्य लोकांना जागरुक करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात कार्यक्रम राबविले जाणार आहे.