मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 जुलै 2025
मुंबई, – न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटीच्या गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांनी वॉण्टेड घोषित केलेल्या एका आरोपीस शनिवारी अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. पवन अमरसिंग जयस्वाल असे या आरोपीचे नाव असून बांधकाम साहित्य पुरवठादार आहेत. अटकेनंतर त्याला तेथील लोकल कोर्टाने सोमवार 7 जुलैपर्यंत ट्रान्झिंट रिमांडवर पाठविले असून त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाणार आहे. या गुन्ह्यांत अटक झालेला पवन जयस्वाल हा नववा आरोपी असून अद्याप पाच आरोपी वॉण्टेड असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यात बँकेचे माजी उपाध्याय हिरेन भानू आणि त्यांची पत्नी गौरी हिरेन भानू यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी न्यू इंडिया बँकेच्या सुमारे 122 कोटीचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला होता. त्यानंतर बँकेच्या वतीने देवार्षि शिशीरकुमार घोष यांनी दादर पोलिसांत संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. गुन्हा दाखल होताच आतापर्यंत या गुन्ह्यांत आठ आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली आहे. त्यात बँकेचा महाव्यवस्थापक हितेश प्रविणचंद्र मेहता, विकासक धर्मेश जयंतीलाल पौन, बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू सुरेंदरकुमार भोन, मनोहर अरुणाचलम मारुतुवार, शासकीय कॉन्ट्रक्टर कपिल कल्याणजी देढिया, उल्हानाथन अरुणाचलम मारुतुवार ऊर्फ अरुणभाई, व्यावसायिक जावेद इक्बाल आजम मोहम्मद फारुख आजम, हॉटेल व्यावसायिक राजीवरंजन रमेशचंद्र पांडे ऊर्फ पवन गुप्ता यांचा समावेश आहे. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
या आरोपींना मदत केल्याप्रकरणी बँकेचे माजी उपाध्याक्ष असलेले हितेन आणि त्यांची पत्नी गौरी भानू यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. या दोघांसहीत इतर सहा आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले त्यात राजस्थानचे अजयसिंग राठोड, झारखंडचा पवन जयस्वाल, कर्नाटकचे शौकत जमादार, संजय राणे अॅण्ड असोशिएट्सचे अभिजीत देशमुख, शिंदे नायक अॅण्ड असोसिएट्सचे लक्ष्मीनारायण नायक, आणि एसआय मोगल अॅण्ड कंपनीचे सुभाष मोगल यांचा समावेश आहे. या आरोपींची माहिती काढताना पवन जयस्वाल हा उत्तरप्रदेशातील गोमतीनगर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर त्याला त्याच्या राहत्या घरातून शनिवारी पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला तेथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याची ट्रान्झिंट रिमांडचा अर्ज मंजूर करताना त्याला 7 जुलैपर्यंत ट्रान्झिंट रिमांडवर पाठविले होते. त्यानंतर त्याचा घेऊन त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पवन जयस्वाल हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून तो बांधकाम साहित्य पुरवठादार म्हणून परिचित आहे. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. फसवणुकीची काही रक्कम त्याला पाठविण्यात आली होती. त्यामुळे त्याला या गुन्ह्यांत वॉण्टेड आरोपी घोषित करण्यात आले होते.