मेडीकलसाठी नेण्यात आलेले दोन आरोपींचे हॉस्पिटलमधून पलायन

ठाणे मुख्यालयातील नऊ पोलीस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 ऑगस्ट 2025
ठाणे, – ठाणे मध्यवर्ती कारागृहातून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये मेडीकलसाठी नेण्यात आलेल्या सातपैकी दोन न्यायालयीन आरोपीने हॉस्पिटलमधून पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नऊ पोलीस कर्मचार्‍यांवर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. त्यात पोलीस हवालदार गंगाराम ज्ञानदेव घुले, गिरीष भिकाजी पाटील, पोलीस शिपाई विलास जगन्नाथ मोहिते, किशोर यशवंत शिर्के अशोक विश्वंभर मुंडे, संदीप सूर्यकांत खरात, सुनिल दिनकर निकाळजे, भरत संग्राम जायभाये आणि चालक पोलीस शिपाई विक्रम आनंद जंबुरे यांचा समावेश असून ते सर्वजण पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. त्यांच्यावर कर्तव्यावर हलगर्जीपणा करुन वरिष्ठांशी खरी माहिती लपवून त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. एकाच वेळेस पोलीस मुख्यालयातील नऊ पोलीस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने ठाणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

विविध गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असलेल्या ठाणे मध्यवर्ती कारागृहातील सात आरोपींना मेडीकलसाठी 4 ऑगस्ट 2025 रोजी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. या आरोपींच्या बंदोबस्ताकामी संबंधित नऊ पोलीस अंमलदारांना तैनात करण्यात आले होते. मेडीकलदरम्यान दोन आरोपी करण दिलीप ढबालिया आणि राजेशभाई पांबर हे हॉस्पिटलमधून पळून गेले होते. त्यापैकी एका आरोपीला बेडी न लावता बाहेर बसून ठेवण्यात आले होते, त्याच्या बंदोबस्तासाठी असलेला पोलीस अंमलदार मोबाईलवर बोलत होता. या दोघांविषयी इतर आरोपीशी चौकशी केली असता ते दोघेही एक्सरे कक्षात गेल्याचे सांगण्यात आले, मात्र तिथे तपासणी केल्यानतर ते दोघेही एक्सरे कक्षात आले नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या दोघांचा स्वच्छतागृहासह हॉस्पिटलमध्ये शोध घेण्यात आला, मात्र ते दोघेही कुठेच सापडले नाही.

दोन आरोपी हॉस्पिटलमधून पळून गेल्याच्या वृत्ताने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर उर्वरित पाच आरोपींना मेडीकलनंतर ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले होते. मात्र या पोलिसांनी सातही आरोपींना कारागृहात जमा केल्याची नोंद केली होती. अशा प्रकारे त्यांनी वरिष्ठांशी ही बाब लपवून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारे संबंधित सर्व पोलिसांनी अशोभनीय तसेच गैरवर्तन करुन पोलीस दलाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांची विभागीय चौकशीचे आदेश जारी केले होते. तोपर्यंत पोलीस हवालदार गंगाराम घुले, गिरीष पाटील, पोलीस शिपाई विलास मोहिते, किशोर शिर्के अशोक मुंडे, संदीप खरात, सुनिल निकाळजे, भरत जायभाये आणि चालक पोलीस शिपाई विक्रम जंबुरे यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आली आहे. 7 ऑगस्टला त्यांच्या निलंबनाचे जारी करण्यात आले आहे.

या निलंबन कारवाईदरम्यान त्यांना दररोज पोलीस मुख्यालयात नियमित हजेरी द्यावी लागणार आहे. वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय यांना ठाणे शहर सोडता येणार नाही. तसे केल्यास त्यांच्यावर अन्य शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. या कालावधीत त्यांचे उदरनिर्वाह भत्ता आणि इतर भत्ते देय राहतील. त्यांना कोणतीही खाजगी नोकरी करता येणार नाही. तसेच कुठला व्यवसाय आणि धंदा सुरु करता येणार नाही. तसे केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तुणूक नियम 1979 मधील नियम सोळाचा भंग केल्याबाबत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. या सर्वांची विभागीय चौकशी करण्यात आली असून त्याचा अहवाल लवकरच पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page