चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला पतीला पेटवून दिले
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत पतीला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मार्च 2025
मुंबई, – चारित्र्याच्या संशयावरुन सिमरन सलमान कुरेशी या 23 वर्षांच्या महिलेला तिच्याच पतीने रॉकेल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना वांद्रे परिसरात घडली. त्यात सिमरन ही 45 टक्के भाजली असून तिच्यावर कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सलमान इर्शाद कुरेशी याच्याविरुद्ध निर्मलनगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून त्याला याच गुन्ह्यांत गुरुवारी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शुक्रवारी 21 मार्चला वांद्रे येथील बेहरामपाडा, लकडेवाली गल्लीत घडली. गौरी सल्लाउद्दीन कुरेशी ही महिला याच परिसरातील गरीबनगर, मशिदवाली गल्ली गेट क्रमांक अठरामध्ये राहते. सलमान हा तिचा जावई तर सिमरन तिची मुलगी आहे. ते दोघेही लकडेवाली गल्लीतील रुम क्रमांक 203 मध्ये राहतात. सलमानचा कपडे विक्रीचा व्यवसाय असून त्याचे सिमरनसोबत विवाह झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच संशयावरुन त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. त्यातून तो सिमरनचा मानसिक आणि शारीरिक शोषण करत होता.
शुक्रवारी 21 मार्चला सिमरन ही तिच्या घरी होती. यावेळी सलमान आणि सिमरन यांच्यात पुन्हा तिच्या चारित्र्यावरुन वाद झाला होता. या वादातून रागाच्या भरात त्याने सिमरनच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले होते. त्यात ती 45 टक्के भाजली होती. त्यामुळे तिला सलमानसह स्थानिक रहिवाशांनी तातडीने कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. ही माहिती समजताच सिमरनची आई गौरी कुरेशी हिच्यासह निर्मलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
यावेळी गौरी कुरेशी हिने सिमरनची चौकशी केल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर गौरी कुरेशी हिच्या जबानीवरुन निर्मलनगर पोलिसांनी तिचा पती सलमान कुरेशी याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सलमानविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच गुरुवारी त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.