चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर पळून गेलेल्या आरोपीस अटक
वांद्रे येथील नामांकित बँकेत केला होता चोरीचा प्रयत्न
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 फेब्रुवारी 2026
मुंबई, – चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर पळून गेलेल्या एका आरोपीस निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. आर्यन राजेश शर्मा असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर वांद्रे येथील एका नामांकित बॅकेत चोरीचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र हा प्रयत्न फसल्यानंतर तो तेथून पळून गेला होता. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
42 वर्षांचे तक्रारदार दहिसर येथे राहत असून एका नामांकित बँकेत शाखाप्रमुख म्हणून काम करतात. वांद्रे येथील खेरनगरातील शाखेत सध्या त्यांची नेमणूक आहे. या बँकेची स्वतची एक स्ट्राँग रुम आहे. दिवसभर काम केल्यांनतर सायंकाळी बँकेचे हेड कॅशिअर बँकेचे स्ट्राँग रुम लॉक करुन चाव्या त्यांच्या केबीनमधील बॉक्समध्ये ठेवतात. 6 जानेवारीला बँकेत जास्त रक्कम असल्याने ते उशिरापर्यंत बँकेत काम करत होते. त्यानंतर ते त्यांच्या घरी निघून गेले. दुसर्या दिवशी त्यांना बँकेचे करन्सी इंचार्जचा कॉल आला होता. त्याने बँकेत चोरीचा प्रयत्न झाल्याचे सांगून स्ट्राँग रुमचा दरवाजा उघडा आहे असे सांगितले. त्यामुळे ते लगेचच बँकेत आले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना स्ट्राँग रुमचा उघडा असल्याचे दिसून आले.
या रुमचे ग्रील गेट बंद होते, मात्र ग्रिल गेटला चावी लावलेली होती. तो दरवाजा कोणीतरी उघडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. सामानाची तपासणी केल्यानंतर बँकेत चोरीचा प्रयत्न झाला होता, मात्र काहीही वस्तू चोरीस गेली नव्हती. तपासादरमन बँकेच्या खिडकीचे ग्रिल एका बाजूने तोडून अज्ञात व्यक्तीने आतमध्ये प्रवेश करुन स्ट्राँग रुममध्ये प्रवेश करुन आतमध्ये चोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले होते. या घटनेनंतर त्यांनी निर्मलनगर पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी घरफोडीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. बँकेसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी शनिवारी आर्यन शर्मा याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच बँकेत प्रवेश करुन चोरीचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला चोरी करता आली नाही. त्यामुळे तो खिडकीतून पळून गेला होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.