मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – मालिका अभिनेता नितीनकुमार सत्यपाल सिंग ऊर्फ नितीन चौहाण (३५) याने बुधवारी त्याच्या गोरेगाव येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून तो बेरोजगार होता, बरेच प्रयत्न करुनही त्याला काम मिळत नव्हते. आईस्क्रिमच्या व्यवसायातही त्याला नुकसान झाले होते. त्यामुळे मानसिक नैराश्यातून त्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी त्याच्या पत्नीची दिडोंशी पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून तिने या घटनेमागे कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा कोणाविरुद्ध तक्रार केली नाही. त्यामुळे तिच्या जबानीनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. नितीनकुमारच्या आत्महत्येचे मालिका क्षेत्रातील कलाकारांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
नितीनकुमार हा गोरेगाव येथील यशोधाम, अमृतवाणी कॉम्प्लेक्सच्या नुपूर अपार्टमेंटमध्ये त्याची पत्नी आणि मुलीसोबत राहत होता. त्याने काही हिंदी मालिकामध्ये काम केले होते. मात्र गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्याच्याकडे काहीच काम नव्हते. त्यातून त्याला मानसिक नैराश्य आले होते. त्याच्यावर मानसोपचार तंज्ञाकडून उपचार सुरु होते. मात्र या उपचारातून त्याला काहीच फरक पडला नाही. काहीच कामधंदा नसल्याने त्याने स्वतचा आईस्क्रिमचा व्यवसाय सुरु केला होता. मात्र या व्यवसायात त्याला प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे तो आणखीन नैराश्यात गेला होता. बुधवारी ६ नोव्हेंबरला सायंकाळी त्याची पत्नी मुलीला घेऊन इमारतीखाली बागेत गेली होती. काही वेळानंतर ती घरी आली, तिने बेल वाजूनही आतून नितीनकुमारने प्रतिसाद दिला नाही. बराच वेळ होऊन त्याने दरवाजा उघडला नाही.
हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. यावेळी तिला नितिनकुमारने सिलिंगला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती समजताच दिडोंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर त्याच्या पत्नीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिने घडलेला प्रकार सांगून या घटनेमागे कोणाविरुद्ध संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे तिची जबानी नोंदवून पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती.