सहलीचा बहाणा करुन बँक खात्याची माहिती घेऊन फसवणुक

सायबर ठगांना मदत करणार्‍या दोन सहकार्‍यांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 जुलै 2025
मुंबई, – सहलीचा बहाणा करुन बँक खात्याची माहिती घेऊन ऑनलाईन फसवणुकीच्या एका नव्या पद्धतीचा उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ते दोघेही काही सायबर ठगांच्या संपर्कात होते. मूकबशीर हिदायतुल्ला रहातकिलकर आणि सुरज खेडकर अशी या दोघांची नावे असून फसवणुकीसाठी त्यांनी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे.

यातील तक्रारदार उत्तर मुंबईतील रहिवाशी आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे 20 लाखांची ऑनलाईन फसवणुक केली होती. शेअर ट्रेडिंगच्या नावाने त्यांच्याकडून त्यांच्या बँक खात्याची डिटेल्स घेऊन ही ुसवणुक करण्यात आली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच सायबर सेल पोलिसांनी तपास सुरु केला होता. ज्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्या सर्व बँक खात्याची माहिती काढण्यात आली होती. त्यातील दोन बँक खाती मूकबशीर आणि सुरज याच्या नावाने उघडण्यात आले होते. त्यामुळे या दोघांनाही पुण्यातील कात्रज आणि अहिल्यानगर येथून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

मूकबशीर हा महाबळेश्वर येथील एका रिसॉर्टमधून दोन ते तीन दिवसांच्या सुट्टीचे पॅकेटचे ऑफर देऊन नागरिकांना आकर्षित करत होता. पुणे आणि महाबळेश्वर येथे पर्यटनस्थळासह रिसॉर्टमध्ये मोफत सुट्टीचे पॅकेज मिळत असल्याने अनेकांनी त्याला संपर्क साधला होता. सहलीच्या बहाण्याने करुन त्यांच्याकडून बँक खात्याची घेऊन त्याचा गैरवापर करुन ऑनलाईन फसवणुक करत होता. अशा प्रकारे मूकबशीने अनेकांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. कमिशन देऊन ही टोळी अनेकांना बँक खाती उघडण्यास प्रवृत्त करत होती. प्रत्येक खात्यामागे संबंधितांना ठराविक रक्कम कमिशन दिले जाते.

बँक खात्यातील ही माहिती विदेशातून ऑनलाईन फसवणुक करणार्‍या मुख्य सायबर ठगांना दिली जात होती. त्यानंतर संबंधित सायबर ठग ऑनलाईन फसवणुकीसाठी संबंधित बँक खात्याचा वापर करत होते. मूकबशीर कंबोडिया येथून वास्तव्यास असलेल्या एका मुख्या सायबर ठगाच्या संपर्कात होता. त्याच्या सांगण्यावरुन तो बँकेतून पैसे काढून ती रक्कम त्याला विदेशात पाठवत होता. याकामी त्याने सुरज खेडकर याची मदत घेतली होती. त्यासाठी त्यांना चांगले कमिशन मिळत होते.

खातेदारांना एकत्र करुन त्यांची राहण्याची सोयन करुन नंतर त्यांच्या बँक खात्याची माहिती काढून ही फसवणुक केली जात असल्याचे तपासात उघडकीस आले. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर या दोघांनाही चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page