मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून फसवणुक
वयोवृद्धेची १४ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून एका ६७ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे चौदा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
तक्रारदार वयोवृद्ध महिला कांदिवली येथे तिच्या वहिनीसोबत राहत असून तिचा मुलगा विदेशात नोकरी करतो. १ सप्टेंबरला ती तिच्या घरी होती. यावेळी तिला विनयकुमार नाव सांगणार्या एका व्यक्तीचा कॉल आला होता. त्याने तो दिल्ली टेलिकॉम विभागातून बोलत असल्याचे सांगून तुमच्या विरोधात दिल्ली सायबर सेलमध्ये मनी लॉड्रिंगचा एक गुन्हा दाखल झाला आहे. तुमचे नाव आणि आधारकार्डचा वापर करुन एका बँकेत खाते उघडण्यात आले असून त्यात मनी लॉड्रिंग झाले आहे. त्यानंतर त्याने तिचा कॉल दुसर्या व्यक्तीला कनेक्ट करुन दिला. या व्यक्तीने स्वतचे नाव राकेशकुमार असल्याचे सांगून तो दिल्ली पोलीस सायबर क्राईम ब्रॅचचा अधिकारी असल्याचे सांगितले. त्याने तिच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती सांगून तिला दिल्ली पोलिसांचे लोगो असलेले तीन लेटर पाठविले होते. त्यामुळे तक्रारदार महिला प्रचंड घाबरली होती.
काही वेळानंतर त्याने तिला एक फोटो पाठवून या व्यक्तीला तुम्ही ओळखता का असा प्रश्न विचारला, मात्र फोटो पाहिल्यानंतर तिने त्याला कधीच पाहिले नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिला चौकशीसाठी दिल्लीला यावे लागेल असे सांगून तिच्या मनात अटकेची भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने दिल्ली येणे शक्य नाही. मी वयोवृद्ध असून माझ्या घरात माझ्याशिवाय कोणीही नाही असे सांगितले. त्यानंतर त्याने तिचा कॉल एका महिलेकडे कनेक्ट केला होता. या महिलेने तिचे नाव शोभा शर्मा असल्याचे सांगून ती सायबर सेलमध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगितले. तिने तुमचा आधारकार्डचा वापर एका हाय प्रोफाईल मनी लॉड्रिंगमध्ये वापरण्यात आला आहे. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाली आहे.
तपास पूर्ण होईपर्यंत तुम्हाला कोणाशी बोलता येणार नाही, कोणाला भेटता येणार नाही. याबाबत कोणालाही काहीही माहिती शेअर करायची नाही. तिने दिलेल्या नियमांचे उल्लघन केल्यास तिला दोन ते तीन वर्षांचा कारावास होईल असे सांगितले. त्यानंतर तिने तिच्या बँक खात्यासह गुंतवणुक केलेल्याा एफडी व इतर माहितीविषयी विचारणा केली. त्यानंतर तिला एका बँक खात्यात चौदा लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात आले. ही रक्कम चौकशीनंतर तिच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर केली जाईल असे सांगितले. त्यामुळे तिने तिच्यावर विश्वास ठेवून चौदा लाख रुपये एका बँक खात्यात ट्रान्स्फर केले. मात्र तिच्या बँक खात्यात ही रक्कम पुन्हा ट्रान्स्फर झाली नव्हती. त्यामुळे तिने घडलेला प्रकार तिच्या मुलाला सांगितला.
यावेळी तिच्या मुलाने तिची सायबर ठगाकडून फसवणुक झाल्याचे सांगून तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने उत्तर सायबर विभागात घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी ३४० (२), ३३६ (३), ३३८, ३३६ (२), ६१ (२), ३१९ (२), ३१८ (४), ३०८ (७), २०४ भारतीय न्याय सहिता सहकलम ६६ (डी), ६६ (सी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली. त्या बँक खात्याची माहिती मिळविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगिलते.