चांगला परतावा देण्याच्या आमिषाने 48 लाखांची फसवणुक
सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्या त्रिकुटाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 फेब्रुवारी 2026
मुंबई, – शेअरमधील गुंतवणुकीवर दोनशे टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून एका डायमंड मार्केटमधील वरिष्ठ अधिकार्यांना सुमारे 48 लाखांना गंडा घालणार्या त्रिकुटाला उत्तर प्रादेशिक सायबर सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. या तिघांवर सायबर ठगांना बँक पुरविल्याचा आरोप असून याच बँक खात्यात कोट्यवधी रुपयांचे ऑनलाईन व्यवहार झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटक आरोपींमध्ये अमर बापू शिंदे, प्रशांत सुनिल कडव आणि प्रणोल संजय राठोड यांचा समावेश असून अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
43 वर्षांचे तक्रारदार बोरिवली परिसरात राहत असून वांद्रे येथील बीकेसी, डायमंड मार्केटमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना शेअरमार्केटविषयी माहिती असून त्यांचे स्वतचे एक डिमॅट खाते आहे. 30 ऑक्टोंबर 2025 रोजी त्यांना टीसीएस कंपनीकडून रिया नावाच्या एका महिलेने कॉल करुन त्यांची कंपनी सेबी रजिस्ट्रर ब्रोकर आहे. ही कंपनी शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करुन कंपनीने आतापर्यंत अनेकांचे पैसे शेअरमध्ये गुंतवून त्यांना चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीमार्फत शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. याच दरम्यान तिने त्यांना कंपनीच्या 662 सभासद असलेल्या एका व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड केले होते.
काही दिवसांनी त्यांना अॅडमिनसह इतर कर्मचार्यांनी संपर्क साधून शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. यावेळी त्यांनी ग्रुपमधील एका सभासदाला कॉल करुन कंपनीविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. या सभासदाने त्यांना ही कंपनी मोठी असून कंपनीचा टर्न ओवर 800 कोटीचा आहे. तसेच प्रत्येक सभासदाला त्यांच्या गुंतवणुकीवर कंपनीकडून दोनशे टक्के परतावा मिळत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2025 या कालावधीत त्यांनी कंपनीच्या माध्यमातून विविध शेअरमध्ये 48 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. त्यातून त्यांना प्रचंड फायदा झाला होता. मात्र हीच रक्कम त्यांना बँक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती.
वारंवार विनंती करुनही त्यांना अॅडमिनसह इतर कर्मचार्यांनी प्रतिसाद दिला नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. हा तपास सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी अमर शिंदे, प्रशांत कडव आणि प्रणोल राठोड या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. ते तिघेही या कटातील काही सायबर ठगांच्या संपर्कात होते.
त्यांच्या सांगण्यावरुन त्यांनी वेगवेगळ्या बँकेत खाती उघडले होते. या खात्याची माहिती नंतर संबंधित सायबर ठगांना देण्यात आली होती. त्यांच्याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत होती. ही रक्कम काढून त्यांनी ती सायबर ठगांना ट्रान्स्फर केली होती. याकामी त्यांना ठराविक रक्कम कमिशन म्हणून मिळाली होती. तपासात ही माहिती उघडकीस येताच त्यांच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. अटकेनंतर तिघांनाही शनिवारी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.