बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजला धम्की
बॉम्बस्फोटाचा मेल एकाच मेलसह व्यक्तीकडून आल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 जुलै 2025
मुंबई, – बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या फिरोज टॉवर इमारतीनंतर आता वांद्रे येथील बीकेसी परिसरातील नॅशनल स्टॉकमध्ये चार आरडीएक्स बॉम्ब ठेवण्यात आले असून यातील पहिला बॉम्बचा दुपारी तीन वाजता स्फोट होणार असल्याचा एक ईमेल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही ईमेल एकाच आयडीसह व्यक्तीने पाठविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे कॉम्रेड पिनाराई विजयान या व्यक्तीविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांसह आता बीकेसी पोलीस ठाण्यात दुसर्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
कौशल किशोर कुमार हे सांताक्रुज येथील कालिना परिसरात राहतात. ते सोशल स्टॉक एक्सचेंजमध्ये सिनिअर मॅनेजर म्हणून कामाला आहेत. वांद्रे येथील बीकेसी, भारतनगर, अदानी इन्सपायरमध्ये त्यांचे स्वतचे कार्यालय आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजची एक अधिकृत ईमेल आयडी आहे. रविवारी 13 जुलै आणि सोमवार 14 जुलैला या ईमेलवर कॉमे्रड पिनाराई विजयान नावाच्या एका अज्ञात व्यक्तीने एक मॅसेज आला होता. त्यात नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या सर्व इमारतीमध्ये चार आरडीएक्स आयईडी बॉम्ब ठेवण्यात आले आहे. या बॉम्बचा कुठल्याही क्षणी स्फोट होणार आहे. त्यातील पहिला बॉम्बस्फोट दुपारी तीन वाजता होणार आहे असे नमूद केले होते.
सोमवारी हा मेल कौशल कुमार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यासह बीकेसी पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथकाने श्वान पथकासह संपूर्ण इमारतीची तपासणी केली होती. मात्र तिथे पोलिसांना काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. बॉम्बस्फोटाचा तो ईमेल बोगस असल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. या घटनेनंतर कौशल कुमार यांच्या तक्रारीवरुन बीकेसी पोलिसांनी कॉमे्रड पिनाराई विजयान याच्याविरुद्ध बॉम्बस्फोटाची धमकी देऊन भीतीयुक्त वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वी त्याच्याविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजला आलेले ईमेल एकाच मेलवरुन आले होते. ही धमकी कॉम्रेड पिनाराई विजयान या व्यक्तीने दिली होती. त्यामुळे या दोन्ही धमक्याच्या घटनेची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. आरोपीच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि सायबर सेल पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.