एनएसईच्या 1.32 कोटीच्या शेअरची विक्री करुन फसवणुक
दिल्लीतील व्यावसायिकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 जुलै 2025
मुंबई, – नजरचुकीने ट्रान्स्फर झालेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) 1 कोटी 32 लाख रुपयांच्या 3685 शेअरची परस्पर विक्री करुन फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काश्मिरी लाल राणा या 65 वर्षांच्या दिल्लीतील व्यावसायिकाविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. काश्मिरी राणाने शेअरच्या विक्रीसह उर्वरित 1315 शेअर आणि 5260 बोनस अशा 6575 शेअरचाही अपहार केल्याचा आरोप आहे. आरोपीच्या व्यावसायिकाच्या अटकेसाठी बीकेसी पोलिसांची एक टिम लवकरच दिल्लीला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
वैभव प्रकाश पर्वत हे तरुण वांद्रे येथील बीकेसी परिसरात राहत असून नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये उपव्यवस्थापक पदावर कामाला आहे. एनएसई ही भारतातील आघाडीची शेअरमार्केट संस्था असून त्यात काहींचे अनलिस्टेड शेअर आहेत. नोवामा वेल्थ फायानान्स लिमिटेड ही बिगर बँकिंग वित्तीय कंपी असून ही कंपनी गुंतवणूकदारांना कर्ज देण्याचे काम करते. या कंपनीकडे एनएसईचे काही शेअर आहे. ते शेअर खरेदी करण्यासाठी त्यांना कंपनीची आधी पत्रव्यवहार आणि नंतर एनएसईकडे परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी मिळाल्यानंतर संबंधित गुंतवणुकदाराच्या डीमॅट खात्यात शेअर ट्रान्स्फर केले जाते. 31 मार्चला काश्मिरी राणा याने संबंधित कंपनीकडे एनएसईचे पाच हजार शेअर खरेदीसाठी अर्ज केला होता. त्याला कंपनीसह एनएसईकडून रितसर मंजुरी मिळाली होती.
या मंजुरीनंतर एनएसईचे कर्मचारी रोहित जगन्नाथ गुप्ते यांच्याकडून काश्मिरी राणा याच्या डीमॅट खात्यात नजरचुकीने पाच हजार शेअर ट्रान्स्फर झाले होते. यावेळी त्याच्या खात्यात 6315 शेअर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजने खरेदी केलेले आणि नजरचुकीने पाठविलेले प्रत्येकी पाच हजार असे 16 हजार 315 हजार जमा झाले होते. मे 2024 रोजी या शेअरला चांगला भाव असल्याने त्याने त्याच्या शेअरची विक्रीसाठी पुन्हा एनएसईची परवानगी मागितली होती. यावेळी त्याने त्याच्या खात्यात नजरचुकीने आलेल्या शेअरची माहिती सांगितली नव्हती. त्यामुळे एनएसईने त्याला पंधरा हजार शेअरची विक्रीची परवानगी दिली होती. त्यापैकी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या 3685 शेअरची त्याने 1 कोटी 32 लाख 66 हजारामध्ये विक्री केली होती.
जून 2024 रोजी हा प्रकार निदर्शनास येताच एनएसईकडून पत्रव्यवहार करुन काश्मिरी राणाला नजरचुकीने आलेले शेअर परत करण्याची विनंती करण्यात आली होती. या विनंतीनंतर त्याने नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या शेअरची विक्री केल्याचे, त्याच्या खात्यात जमा असलेले 1315 शेअर परत करण्याची तसेच ज्या किंमतीत शेअर खरेदी केले होते, तीच रक्कम देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र एक वर्ष उलटूनही त्याने नॅशनल स्टॉक एक्सचेंजला विक्री केलेल्या शेअरची रक्कम परत केली नाही तसेच उर्वरित शेअर पाठविले नव्हते. याबाबत वारंवार विचारणा करुनही त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता.
काश्मिरी राणाकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच एनएसईच्या वतीने वैभव पर्वत यांनी बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. काश्मिरी हा मूळचा नवी दिल्लीतील शालिमार बाग, एसी/109 चा रहिवाशी असल्याने पोलिसांची एक टिम लवकरच दिल्लीला जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशीनंतर दोषी व्यावसायिकाविरुद्ध अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.