ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारास अटक
व्हिला बुक करण्यासाठी आगाऊ पेमेंट घेऊन फसवणुक करायचा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 डिसेंबर 2025
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला वनराई पोलिसांनी अटक केली. आकाश रुपकुमार जाधवानी असे या 25 वर्षीय आरोपी गुन्हेगाराचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आकाश हा सराईत गुन्हेगार असून त्याने सोशल साईटवर वेगवेगळ्या व्हिलाची जाहिरात करुन व्हिला बुक करण्यासाठी आगाऊ पेमेंट घेऊन अनेकांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याविरुद्ध दहा ते पंधराहून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे बोलले जाते.
28 वर्षांचा आदित्य सूर्यप्रकाश तोशनिवाल हा गोरेगाव परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. कंपनीच्या कर्मचार्यांसाठी 15 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट असे दोन दिवस पिकनिकचे आयोजन करण्यात आले होते. कर्मचार्यासाठी कंपनीने लोणावळा येथे एक व्हिला बुक करण्याची जबाबदारी आदित्यवर सोपविली होती. त्यामुळे त्याने सोशल मिडीयावर लोणावळा येथील व्हिलाची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याला ला राईव्ह नावाच्या एका व्हिलाची जाहिरात दिसली होती. या जाहिरातीवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर समोरील व्यक्तीने त्याचे नाव निशांत अहुजा असल्याचे सांगतले. त्याने व्हिला उपलब्ध असल्याचे सांगून त्याला दोन दिवसांसाठी दिड लाख रुपये भाडे होईल असे सांगितले.
हा व्हिला त्यांच्या बजेटमध्ये असल्याने त्याने त्याला होकार देत व्हिला बुकींगची रक्कम दुसर्या दिवशी देण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी निशांतने त्याला व्हिलाची माहितीसह जीएसटी क्रमांक आणि पेमेंट करण्यासाठी बँकेचा खाते क्रमांक पाठविला होता. याच बँक खात्यात त्याने आदित्यला पेमेंट करण्यास सांगितले होते. त्यामुळे त्याने त्याने त्याला संबंधित बँक खात्यात दिड लाख रुपये पाठविले होते. 14 ऑगस्टला निशांतने त्याला फोन करुन लाईट दुरुस्तीच्या कामासाठी व्हिला बंद असल्याने त्यांचे बुकींग कॅन्सल केल्याची माहिती दिली. यावेळी त्याने त्यांचे पेमेंट पाच ते सात दिवसांत परत मिळेल असे सांगून फोन कट केला.
एक आठवडा उलटूनही त्याने पैसे परत पाठविले नाही. त्यामुळे आदित्यने त्याला कॉल केला, मात्र निशांतचा कॉल बंद येत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच आदित्यने जीएसटी क्रमांकाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो जीएसटी क्रमांक फर्न हॉटेलचा असल्याचे त्याच्या लक्षात आले. व्हिला बुक करण्याचा बहाणा करुन निशांतने त्याच्याकडून व्हिलाचे संपूर्ण पेमेंट घेऊन, व्हिला कॅन्सल झाल्याचे सांगून सात दिवसांत पेमेंट करण्याचे आश्वासन दिले. मात्र पेमेंट न करता बुकींग केलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्याने वनराई पोलिसांना घडलेला प्रकार सांगून निशांत अहुजा नाव सांगणार्या व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच आकाश जाधवानी याला पोलिसांनी अटक केली.
तपासात आकाश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने अशाच प्रकारे अनेक ठिकाणी गुन्हे केले आहे. सोशल मिडीयावर व्हिला बुक करण्याच्या बहाण्याने त्याने अनेकांकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती. या पैशांतून त्याने मौजमजा तसेच महागडे वस्तू खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईसह इतर शहरात अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.