ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक
पॅनकार्ड अपडेटच्या नावाने कापड व्यापार्याची फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ जुलै २०२४
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस सहा महिन्यानंतर विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. आदिल अनिसुर रेहमान असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर पॅनकार्ड अपडेटच्या नावाने एका कापड व्यापार्याची पाच लाखांची फसवणुक केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांत त्याच्या अन्य काही सहकार्यांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
७२ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार योगेंद्र राजेंद्र अग्रवाल हे व्यापारी असून ते विलेपार्ले येथील सुभाष रोड, अनिशा अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा काळबादेवी परिसरात कपड्याचा व्यवसाय आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एक मॅसेज आला होता. त्यात त्यांना पॅनकार्ड अपडेट करण्यास सांगण्यात आले होते. नाहीतर त्यांचा युनो अकाऊंट आज बंद होईल असे नमूद केले होते. बँक खाते बंद होईल या भीतीने त्यांनी मॅसेजवरील लिंक ओपन करुन त्यांचे पॅनकार्ड, आधारकार्डची माहिती अपलोड केली होती. फॉर्म सबमीट केल्यानंतर काही वेळानंतर त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. त्याने तो त्यांच्या बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांनी लिंकवर भरलेली माहिती अपूर्ण असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांच्याकडून सर्व माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तो बँक कर्मचारी असल्याचे समजून त्यांनीही त्याला त्यांची वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची माहिती शेअर केली होती. काही वेळानंतर त्यांना त्यांच्या मोबाईलवर काही मॅसेज प्राप्त झाले होते. त्यात त्यांच्या बँक खात्यातून सुमारे पाच लाख रुपये डेबीट झाल्याचे दिसून आले. पॅनकार्ड अपडेटच्या नावाने या ठगाने त्यांच्याकडून त्यांची माहिती घेऊन ही फसवणुक केल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोर्टलसह विलेपार्ले पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु होता. आरोपीचा शोध सुरु असताना आदिल रेहमान या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आले. फसवणुकीसाठी त्यानेच सायबर ठगांना बॅक खाते उघडून दिले होते. त्याच्याच बँक खात्यात फसवणुकीची ही रक्कम जमा झाली होती. त्यातील काही रक्कम त्याला कमिशन म्हणून मिळाली होती तर उर्वरित रक्कत त्याने संबंधित सायबर ठगाला दिली होती. तपासात ही माहिती उघडकीस येताच आदिलला पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.