मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० ऑगस्ट २०२४
मुंबई, – टास्कच्या माध्यमातून चांगले कमिशन देण्याचे आमिष दाखवून एका २४ वर्षांच्या तरुणाची सुमारे चार लाखांची ऑनलाईन फसवणुक करणार्या कटातील एका आरोपीस गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन महिन्यांनी जुहू पोलिसांनी अटक केली. प्रणव रघुनाथ तांबा असे या आरोपीचे नाव असून त्याने फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँकेत खाते उघडून दिले होते. याच बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
तक्रारदार तरुण विलेपार्ले येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. १६ मे २०२४ रोजी त्याच्या व्हॉटअपवर एक मॅसेज आला होता. त्यात मार्केट एजन्सी या कंपनीने गुगल रिव्हू पाठविल्यास चांगले कमिशन मिळतील असे नमूद केले होते. या मॅसेजमध्ये एक लिंक होते. ही लिंक ओपन केल्यानंतर त्याला एका हॉटेलची माहिती दिसली होती. हॉटेलच्या साईटवर रिव्ह्यू पाठविल्यांनतर त्याला कमिशनची रक्कम मिळणार होती. कमिशनच्या आमिषाला बळी पडून त्याने विविध हॉटेलला रिव्ह्यू पाठवून त्याचे स्क्रिनशॉप संबंधित व्यक्तीला पाठवून दिले होते. या रिव्ह्यूनंतर त्याला प्रत्येक टास्कमागे ५० रुपये मिळत होते. त्यानंतर त्याला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये सामिल करण्यात आले होते. यावेळी त्याला प्रिपेड टास्क देण्यात आले होते. त्यात त्याला प्रत्येक टास्कमागे दिडशे रुपयांचे कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यामुळे त्याने विविध टास्कसाठी सुमारे चार लाख रुपये ट्रान्स्फर केले होते, मात्र त्याला टास्कवर कुठलेही कमिशन मिळाले नाही. विचारणा केल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून त्याला काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. टास्कच्या नावाने चांगले कमिशन मिळेल असे सांगून या सायबर ठगांनी त्याची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्याने जुहू पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी प्रणव तांबा याला ताब्यात घेतले होते. त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली. फसवणुकीसाठी त्याने सायबर ठगांना बँक खाते उघडून दिले होते. ही रक्कम या ठगांना पाठविल्यानंतर त्याला ठराविक रक्कम कमिशन म्हणून दिली जात होती.