ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक
वयोवृद्ध महिलेच्या बँक खात्यातून ४.६९ लाखांचा अपहार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑगस्ट २०२४
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस सहा महिन्यानंतर गजाआड करण्यात अखेर गोरेगाव पोलिसांना यश आले आहे. सय्यद इजाज अहमद तुल्ला असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सय्यद याच्याच बँक खात्यात ही रक्कम जमा झाली होती. त्याने फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
६२ वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार महिला गोरेगाव येथे राहत असून ती नामाकिंत कॉलेजमधून तर तिचे पती एक्साईज विभागातून निवृत्त झाले आहे. ७ फेब्रुवारीला ती तिच्या घरी असताना तिच्या बँक खात्यातून २३६ रुपये डेबीट झाले होते. तिने कुठलाही ऑनलाईन व्यवहार केला नव्हता. तरीही तिच्या खात्यातून ही रक्कम डेबीट झाली होती. त्यामुळे तिने गुगलवर बँकेचा कस्टमर केअरचा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केा. त्यात तिला एक नंबर सापडला. या मोाबईल क्रमांकावर तिने संपर्क साधला, मात्र समोरुन कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तिला दुसर्या मोबाईलवर एका व्यक्तीने फोन केला. त्याने तो बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्याने तिला बोलण्यात गुंतवून तिला ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल असे सांगितले. त्यानंतर त्याने बँकेचे ऍप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करुन तिच्या बँक खात्याची माहिती घेतली. काही वेळानंतर तिच्या मोबाईलवर काही ओटीपी क्रमांक येऊ लागले. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने त्याचा कॉल बंद केला. त्यानंतर तिच्या खात्यातून ३ लाख ५५ हजार आणि १ लाख १४ हजार असे ४ लाख ६९ हजार रुपये डेबीट झाले होते.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी सहा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या सय्यद इजाज तुल्ला याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्याच्याच बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्यासाठी त्याने सायबर ठगांना बँकेत खाते उघडून दिले होते. तपासात ही माहिती उघड होताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.