टास्कच्या नावाने वरिष्ठ सल्लागार महिलेची फसवणुक

४९ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ डिसेंबर २०२४
मुंबई, – शहरातील विविध हॉटेल्सला रेटींग दिल्यास चांगले कमिशन देण्याची बतावणी करुन एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ सल्लागार महिलेची सुमारे ४९ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी मोहम्मद इसरार अब्ररार या आरोपी दिल्लीतून सायबर सेल पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले असून याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. मोहम्मद इसरारने फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. त्याच्यासोबत त्याच्या इतर सहकार्‍यांनी अशाच प्रकारे बँक खाती पुरविल्याचे तपासात उघडकीस आल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

श्रृती अरुण दिवाकर बाजपेयी ही मूळची छत्तीसगढच्या बिलासपूरची रहिवाशी असून सांताक्रुज येथे तिच्या मैत्रिणीसोबत राहते. एका खाजगी कंपनीत ती वरिष्ठ सल्लागार म्हणून कामाला आहे. ९ मार्चला तिला प्रिती शर्मा नावाच्या एका महिलेचा कॉल आला होता. तिला पार्टटाईम जॉबची ऑफर देताना तिला दिवसाला एक हजार मिळतील असे सांगितले. डेमो म्हणून तिने तिला गुगलवर जाऊन वीस हॉटेल्सना रेटींग देण्याचे काम दिले होते. त्यामुळे तिने हॉटेल्सना रेटींग दिले होते. प्रत्येक रेटींगमागे तिला पन्नास रुपये मिळाले होते. ही रक्कम तिच्या बँक खात्यात जमा झाले होते. यावेळी प्रितीने दिवसभरात व्यवस्थित रेटींग दिल्यास तिला दिवसाला साडेआठ हजार रुपये मिळतील असे सांगून तिचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. काम सोपं असल्याने तिने तिला होकार दिला होता. त्यानंतर तिने प्रितीच्या सांगण्यावरुन हॉटेल्सना रेटींग देण्याचे काम सुरु केले होते. त्यामोबदल्यात तिला पैसे मिळत होते. तिच्या कामावर खुश होऊन प्रितीने तिला एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल केले होते. त्यानंतर तिला जास्त कमिशनची ऑफर देण्यात आली होती. त्यात तिला काही प्रिपेड टास्क देण्यात आले होते. या टास्कवर तिला जास्त कमिशन मिळणार होते. त्याकामी तिला विनोद त्रिवेदी नावाचा एक शिक्षक मदत करणार होता. त्याच्या सांगण्यावरुन तिने विविध टास्कसाठी पैसे ट्रान्स्फर केले होते.

९ मार्च ते १३ मार्च २०२४ या कालावधीत तिने विविध प्रिपेड टास्कसाठी ४९ लाख २८ हजार १७५ रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर तिला २९ हजार ७०० रुपयांचे कमिशन देण्यात आले होते. कमिशनची ही रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. मात्र उर्वरित पैशांसह कमिशनची मागणी करुन तिला समोरुन काही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तिने मारिया नावाच्या एका महिलेशी संपर्क साधून तिच्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी मारियाने तिला १९ लाख ७० हजार रुपये भरले तर तिचे सर्व पैसे तिच्या बँक खात्यात जमा होतील असे सांगितले. मात्र तिने आणखीन पैसे भरण्यास नकार दिला होता. त्यानंतर संबंधित आरोपींनी तिचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता, तिला ग्रुपमधून बाहेर काढण्यात आले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध १२० (ब), ४१९, ४२०, ४६५,, ४६७, ४६८, ४७१, ३४ भारतीय दंड सहिता सहकलम ६६ सी, ६६ (डी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ज्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्या बँक खात्याचा तपशील काढून संबंधित खातेदारांची माहिती काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन एक टिम दिल्लीला गेले होते. या पथकाने दिल्लीचा रहिवाशी असलेल्या मोहम्मद इसरार अब्ररार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याच्याच बँक खात्यात साडेतीन लाख रुपये ट्रान्स्फर झाले होते. ही रक्कम त्याने एटीएममधून काढून त्याच्या दुसर्‍या सहकार्‍याला दिले होते. याकामी त्याला काही ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते. या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले होते. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्या चौकशीतून त्याच्या इतर सहकार्‍यांचे नाव समोर आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page