मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – चांगला परवाता देतो असे सांगून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एकाच कुटुंबातील तिघांची १० लाख ६४ हजाराची फसवणुक केल्याप्रकरणी एका आरोपीस गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. वैभव गणपत ठोंबरे असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील ३५ वर्षांचे तक्रारदार गोरेगाव येथील मोतीलालनगर परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते सध्या एका खाजगी बँकेत आयटी अधिकारी म्हणून कामाला आहेत. त्यांच्या पत्नीच्या मोबाईलमध्ये शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीबाबत अनेक मॅसेज येत होते. मात्र तिने त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. मॅसेज वाचत असताना तिने त्यांना शेअरमार्केटमध्ये गंुंतवणुक करण्याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी तिला खात्री करुन गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर तिने शेअरमार्केटमध्ये दोन लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर तिला काही परतावा मिळाला होता. त्यामुळे तिला संबंधित व्यक्तीवर विश्वास बसला होता. त्यानंतर त्यांच्यासह त्यांचा मेहुणा आणि मेहुणी या तिघांनी शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान संबंधित अज्ञात व्यक्तीने त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल करुन घेतले होते. त्यात शेअरमार्केटमधील नियमित घडामोडीची माहिती दिली जात होती.
कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास हमखास पैसे डबल होतील याची माहिती सांगितली जात होती. त्याच्या सल्ल्यानंतर त्यांच्यासह त्यांच्या मेहुणा मेहुणीने १० लाख ६४ हजाराची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्यातील काही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला, मात्र बरेच प्रयत्न करुनही त्यांना ती रक्कम ट्रान्स्फर करता आली नाही. संबंधित व्यक्तीकडे विचारणा केल्यानंतर त्याने त्यांना प्रतिसाद देणे बंद केले होते. मूळ रक्कमेसह परतावा रक्कम न देता त्याने त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या सात महिन्यांपासून फरार असलेलय वैभव ठोंबरे याला संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानेच सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खात्याची माहिती पुरविल्याचे उघडकीस आले. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम नंतर त्याने संबंधित सायबर ठगांना दिली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडीनंतर चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.