ऑनलाईन मेल स्पूफिंगद्वारे व्यावसायिक महिलेला गंडा

वॉण्टेड नायजेरीयन नागरिकाला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2025
मुंबई, – विदेशातील केमिकल निर्यातीवर चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन मेल स्पूफिंगद्वारे एका व्यावसायिक महिलेला गंडा घालणार्‍या वॉण्टेड नायजेरीय नागरिकाला अखेर माटुंगा पोलिसांनी अटक केली. अडोल्फस उचे ओनुमा असे या नागरिकाचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार महिला ही केमिकल व्यावसायिक असून ती तिच्या कुटुंबियांसोबत माटुंगा परिसरात राहते. 26 जानेवारीला तिला तिच्या मेल आयडीवर एका अज्ञात व्यक्तीने एक मॅसेज पाठविला होता. त्यात त्याने तिला युके देशात केमिकल विक्री करुन अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. यावेळी त्याने त्याच्या व्यवसायाची माहिती तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा प्रस्ताव तिला आवडला होता. त्यामुळे तिने त्याच्यासोबत व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिने युकेच्या भारतातील अरुणाचल प्रदेशातील राम ट्रेडर्स कंपनीकडून एक लिटर सॅपल केमिकलची ऑर्डर दिली होती. त्यासाठी तिने त्याने दिलेल्या बँक खात्यात तीन लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. दोन दिवसांत केमिकल पार्सल येईल सांगून त्याने ते पार्सल पाठविले नाही. त्यामुळे तिने दोन्ही कंपन्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या दोन्ही कंपन्या बोगस असल्याचे तिच्या लक्षात आले होते.

फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने माटुंगा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त रागसुधा आर. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सर्जेरा पाटील, सायबर सेल विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रविणकुमार पाटील, पोलीस हवालदार संतोष पवार, पोलीस शिपाई गोविंद शिरगिरे यांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन या पथकाने नवी मुंबईतून अडोल्फस ओनुमा याला ताब्यात घेतले होते.

चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला. तो नायजेरीयन नागरिक असून सध्या नवी मुंबईतील खारघर परिसरात राहतो. या टोळीने मुंबईसह आंधप्रदेशच्या मुदिनेपल्ली आणि गुजरात चंगोदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याच्या इतर काही सहकार्‍यांची नावे समोर आले आहे. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page