ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील तीन वॉण्टेड आरोपींना अटक

56 एटीएम कार्ड, आठ मोबाईल व 92 हजाराची कॅश जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 जुलै 2025
मुंबई, – छत्तीसगढच्या बस्तर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील तीन वॉण्टेड आरोपींना कांदिवली पोलिसांनी अटक केली. मोहम्मद इम्रान अन्सारी, अलीउद्दीन सरफुद्दीन अन्सारी आणि राजकुमार मधुबन प्रसाद अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर या तिघांनाही छत्तीसगढ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तिन्ही आरोपी ऑनलाईन फसवणुक करणार्‍या झारखंडच्या जामतारा आंतरराष्ट्रीय ऑनलाईन गुन्हे करणार्‍या टोळीचा सदस्य आहे. त्याच्याकडून पोलिसांनी विविध बँकांचे 56 एटीएम कार्ड, आठ मोबाईल आणि 92 हजाराची कॅश जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आडाणे यांनी सांगितले.

27 जूनला छत्तीसगढच्या सायबर सेल पोलिसांकडून मुंबई पोलिसांना एक मेल प्राप्त झाला होता. त्यात बस्तर शहरातील बोधघाट पोलीस ठाण्यात एक ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांतील आरोपी झारखंड येथून मुंबईत पळून आले आहे. मुंबईत आल्यानंतर ते वेगवेगळ्या एटीएम सेंटरमधून पैसे काढत आहे. सध्या ते कांदिवलीतील एका हॉटेलमध्ये राहत असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची मदत मागितली होती. या मेलची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आडाणे यांना आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथकाची नियुक्तीचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त निता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र अडाणे, पोलीस निरीक्षक हरिश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कादबाने, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद गावकर, पोलीस हवालदार जगदाळे, नारनवर, पोलीस शिपाई सांगळे, संकेत सांत, आदित्य राणे, महिला पोलीस शिपाई जयश्री तलवारे यांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना संबंधित आरोपी कांदिवलीतील 90 फिट रोड , एका हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती प्राप्त झाली होती.

या माहितीनंतर पोलिसांनी हॉटेलमधील एका रुममध्ये छापा टाकून मोहम्मद इम्रान, अलीउद्दीन आणि राजकुमार या तिघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. पोलीस ठाण्यात आणल्यांनतर या तिघांची चौकशी केल्यानंतर ते तिघेही ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांत मोस्ट वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. ऑनलाईन फसवणुक करणारी जामतारा टोळी असून याच टोळीचे ते तिघेही सदस्य आहे. या तिघांकडून पोलिसांनी विविध बँकेचे 56 एटीएम, आठ मोबाईल आणि 92 हजार रुपयांची कॅश पोलिसांनी जप्त केली आहे.

यातील मोहम्मद इम्रान आणि अलीउद्दीन हे दोघेही झारखंडच्या देवघर आणि करमाठा-जामताराचे तर राजकुमार हा चालक असून तो उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. या तिघांविरुद्ध विविध राज्यात ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्यांच्या अटकेने अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अटकेनंतर तिन्ही आरोपींचा ताबा छत्तीसगढ पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आडाणे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page