मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ मार्च २०२४
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांत अज्ञात सायबर ठगांनी एका महिलेसह दोघांची १३ लाख ७० हजार रुपयांची फसवणुक केल्याची घटना अंधेरी आणि वरळी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वर्सोवा आणि वरळी पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
३१ वर्षांच्या तक्रारदार तरुण त्याच्या वयोवृद्ध आई-वडिलांसोबत राहतो. त्याचे त्याच्या आईसोबत एका खाजगी बँकेत खाते आहे. १८ एप्रिलला तो त्याच्या अंधेरीतील कार्यालयात होता. यावेळी त्याला त्याच्या बँक खात्यातून अडीच लाख रुपये डेबीट झाल्याचा एक मॅसेज आला होता. त्यामुळे त्याने त्याच्या आईला पैशांबाबत विचारणा केली होती. यावेळी तिने बँकेतून ही रक्कम काढली नसल्याचे तसेच तिला अडीच लाखाबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने बँकेत जाऊन विचारपूस केली होती. यावेळी त्याला त्याच्या वयोवृद्ध आईसह त्याच्या बँक खात्यात सुमारे साडेपाच लाख रुपये काढून अज्ञात सायबर ठगाने त्यांची फसवणुक केल्याचे दिसून आले. त्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहितीसह पासवर्ड कोणालाही शेअर केले नव्हते. तरीही त्यांच्या बँक खात्यातून ही रक्कम दुसर्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्याने वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती.
दुसरी घटना वरळी परिसरात घडली. यातील तक्रारदार वयोवृद्ध महिला वरळीतील आदर्शनगर परिसरात राहत असून तिचे एका खाजगी बँकेत बचत खाते आहे. १६ एप्रिलला घरी असताना तिला राहुल राम नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन तो बँकेच्या बीकेसी येथील मुख्य कार्यालयातून बोलत आहे. तिचे बँक खाते बंद झाले असून ते खाते ऍक्टिव्ह करायचे असेल तर तिला बीकेसी येथील बँकेत यावे लागेल असे सांगितले. काही वेळानंतर त्याने तिचे कॉल आणि मॅसेज त्याच्या मोबाईलवर ट्रान्स्फर केले होते. २० एप्रिलला तिला पुन्हा संबंधित व्यक्तीने व्हॉटअपवर कॉल करुन तिच्या बँक खात्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे दोन दिवसांनी ती वरळीतील बँकेत गेली होती. यावेळी तिला १६ एप्रिल ते २१ एप्रिल या कालावधीत तिच्या बँक खात्यातून संबंधित व्यक्तीने ८ लाख ३० हजार रुपयांचे ऑनलाईन केल्याचे दिसून आले. त्यामुळे ही रक्कम तिच्या खात्यातून डेबीट झाली होती. या दोन्ही घटनेनंतर त्यांनी स्थानिक पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.