मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून सुमारे तेरा लाख रुपयांची फसवणुकप्रकरणी दिनेश शांतीलाल नाहोर या आरोपीस दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. शहरातील एका नामांकित कॉलेजच्या प्राध्यापकाच्या तक्रारीवरुन सायबर सेल पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीला गजाआड केले. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
४९ वर्षांचे तक्रारदार कल्याण येथे राहत असून दक्षिण मुंबईतील एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात. ते स्टॉक मार्केटमध्ये जसे जमेल तसे गुंतवणुक करतात. फेबुवारी महिन्यांत त्यांना फेसबुकवर स्टॉक ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्यासंदर्भात एक लिंक आली होती. त्यात गुंतवणुकीबाबत नवीन शिकायला मिळेल म्हणून त्यांनी ती लिंक ओपन केली होती. त्यानंतर त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये ऑनलाईन ट्रेडिंग देऊन विविध स्टॉक मार्केटची माहिती देऊन कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास तुम्हाला फायदा होईल याची माहिती दिली जात होती. इतकेच नव्हे तर काही लोकांना त्यांच्या सल्ल्याने शेअरमध्ये गुुंतवणुक केल्यानंतर किती फायदा झाला आहे याबाबत स्क्रिनशॉटद्वारे माहिती सांगितली जात होती. त्यांच्या या आमिषाला बळी पडून त्यांनीही विविध स्टॉक ट्रेडिंगमध्ये सुमारे पावणेआठ लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना काही दिवसांत प्रचंड फायदा झाला होता, त्यांच्या ऍपद्वारे त्यांना ही माहिती मिळत होती. त्यानंतर त्यांना ग्रुपच्या ऍडमीनने आणखीन गुंतवणुकीबाबत सल्ला दिला होता. ही गुंतवणुक केली नाहीतर त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर फायदा मिळणार नाही किंवा त्यांची रक्कम त्यांना काढता येणार नाही असे अप्रत्यक्ष धमकी देण्यात आली होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्या गुंतवणुकीच्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. यावेळी त्यांना तीस टक्के रक्कम म्हणजे सव्वापाच लाख रुपये आम्हाला द्यावी लागेल असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी मित्रांकडून उसने पैसे घेऊन त्यांना सव्वापाच लाख रुपये पाठविले होते. मात्र ही रक्कम पाठवून त्यांनी त्याला पैसे पाठविले नाही.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या पथकाने संबंधित बॅक खात्याची माहिती काढून यातील एका बॅक खात्याची माहिती काढली होती. ते खाते दिनेश नाहोर याचे होते. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्याने फसवणुकीसाठी सायबर ठगांना स्वतचे नाव बँक खाते उघडून दिले होते. त्याच्या खात्यात जमा झालेली रक्कम त्याने संबंधित ठगांना पाठविली होती. त्यासाठी त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते. तपासात ही माहिती उघडकीस येताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आली आहेत. या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.