मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – खाजगी सोशल साईटवरुन घराच्या बांधकामासाठी ऑनलाईन स्टिल ऑर्डर करणे एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. स्टिलसाठी सुमारे साडेसात लाखांचे पेमेंट घेऊन स्टिलची डिलीव्हरी न पाठविता या सायबर ठगाने व्यावसायिकाची फसवणुक केली. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी फसवुणकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या सायबर ठगाचा शोध सुरु केला आहे.
अमानुल्ला अबूबकर खान हे व्यावसायिक असून सांताक्रुज परिसरात राहतात. त्यांचा टाटा मोटारचे सर्व्हिस सेंटर आहे. त्यांना त्यांच्या घराच्या बांधकामासाठी स्टिलची गरज होती. त्यामुळे त्यांनी एका सोशल साईटवरुन स्टिलच्या किंमत काढण्याचा प्रयत्न केला होता. २५ ऑगस्टला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो जेजे स्टिल कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्याने त्यांना इतर कंपनीपेक्षा कमी किंमतीत स्टिल देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला १२ टन एपॉक्सी कोटी स्टिलची ऑर्डर दिली होती. या स्टिलची किंमत ७ लाख ५६ हजार ८५२ रुपये इतकी होती, त्यामुळे त्याने त्यांना दोन लाख रुपये बुकिंग पेमेंट करण्यास सांगितले होते. त्यांनी त्याला दिलेल्या बँक खात्यात दोन लाख रुपये पाठवून दिले होते. त्यानंतर त्याने स्टिल बुक झाल्याचे सांगून त्यांना उर्वरित ५ लाख ५६ हजार ८५२ रुपयांचे बिल पाठविले होते. त्यामुळे त्यांनी ती अकाऊंटही त्याला ट्रान्स्फर केले होते. संपूर्ण पेमेंट केल्यांनतर त्यांना ४ सप्टेंबरपर्यंत स्टिल मिळेल असे सांगण्यात आले.
मात्र दिलेल्या मुदतीत त्याने स्टिलची डिलीव्हरी केली नाही. त्यामुळे त्यांनी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. नंतर त्याने त्यांचा मोबाईल ब्लॉक केला होता. ऑनलाईन फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी विनोबा भावे नगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेल विभागाकडून तपास सुरु आहे.