ड्रग्ज कुरिअर पार्सलच्या नावाने तरुणाची ऑनलाईन फसवणुक

कारवाईची भीती दाखवून तरुणाला कपडे काढण्यास प्रवृत्त केले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – ड्रग्ज कुरिअर पार्सलच्या नावाने एका तरुणाची अज्ञात सायबर ठगाने ऑनलाईन फसवणुक केली. या तरुणाला कपडे काढण्यास प्रवृत्त केले, कपडे काढले नाहीतर त्याला अटकेची भीती दाखविण्यात आली आहे. याप्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरुन वाकोला पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या गुन्ह्यांत लक्षयीय वाढ झाल्याने या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह सायबर सेल पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

गेल्या काही दिवसापासून सायबर गुन्हे वाढतच चालले आहे. कधी केंद्रीय तपास यंत्रणा तर कधी राज्यातील पोलीस अधिकाऱ्याच्या खोटया नावाचा वापर करून ठग हे नागरिकांना फसवत आहेत. ऑनलाईन अप्स डाऊन लोड करण्यास सांगून तपासणी करण्यापासून ते बँक खाते तपासायचे आहे असे सांगून तपशील घेऊन खात्यावर डल्ला मारतात. डिजिटल अटकेची भीती दाखवून ठग हे फसवणूक करत आहेत. तर डिजिटल अटकचे वाढते प्रकार रोखण्यासाठी आयफोरसीने पुढाकार घेतला आहे. तरी देखील एनसीबी, सायबर क्राईम पोलीस ठाण्याच्या कारवाईच्या नावाने फसवणुकीच्या घडत आहेत. वाकोला येथे तक्रारदार तरुण राहतो. रविवारी तो घरी होता. तेव्हा एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने तो एका खासगी कुरिअर कंपनी मधून बोलत असल्याचे भासवले. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग आढळून आल्याच्या भूलथापा मारल्या. कुरिअर केलेली ती ऑर्डर आधार कार्डशी लिंक आहे. जर कारवाई रोखायची असल्यास सायबर क्राईममध्ये जावे लागेल अशा त्याने भूलथापा मारल्या. त्यानंतर त्याने तो फोन दुसऱ्याकडे ट्रान्स्फर केला.
फोनवर बोलणाऱ्याने तो दिल्ली सायबर पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगितले. ठगाने तरुणाला स्काईप हे अप्स डाऊन लोड करण्यास सांगितले. भीतीपोटी त्याने ते अप्स डाऊन लोड केले. सर्वोच्च न्यायालयाचे अनलॉजेमेंट सेंटर असून कागदपत्रांची तपासणी करून ती आरबीआय कडे पाठवले जाणार आहेत. त्यामुळे खात्यात असलेले पैसे एका खात्यात पाठवा. कारवाई पूर्ण झाल्यावर ते पैसे पुन्हा दोन तासात खात्यात पाठवू अशा त्याने भूलथापा मारल्या. त्यानंतर ठगाने तक्रारदार याना स्काईप्स आयडीवर लेटर पाठवले. त्यावर विश्वास ठेऊन तक्रारदार याने एक लाख रुपये खात्यात वर्ग केले. आणखी काही तपासणी बाकी आहेत असे त्याना सांगितले. फायनल क्लिअरन्स करण्यासाठी ती फाईल नारकोटिक्स विभागाकडे पाठवली आहे. ठगाने तपासणीच्या नावाखाली शरीरावर टॅटू आहेत का अशी विचारणा केली. टॅटूच्या नावाखाली तरुणाचे कपडे काढण्यास सांगितले. जर कपडे काढले नाही तर अटक केली जाईल. अटक केल्यावर भरलेले पैसे परत मिळणार नाही अशा भूलथापा मारल्या. हा प्रकार त्याना संशयास्पद वाटला. त्यानंतर त्याने वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page