मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – फेसबुकवर रिल पाहून आवडलेला ड्रेस खरेदी करणे कांदिवलीतील एका ५४ वर्षांच्या महिलेला चांगलेच महागात पडले आहे. तेराशे रुपये किंमत असलेल्या या ड्रेसच्या पेमेंटनंतर अज्ञात सायबर ठगांनी तिच्या बँक खात्यातून १ लाख ३८ हजार रुपये विविध बँक खात्यात ट्रान्स्फर करुन तिची फसवणुक केली. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अज्ञात सायबर ठगाचा शोध सुरु केला आहे.
तक्रारदार महिला ही कांदिवलीतल ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात राहत असून तिचे पती एका खाजगी कंपनीत अकाऊंटटचे काम करतात. ३ नोव्हेंबरला ती तिच्या घरी होती. फेसबुकवर रिल पाहत असताना तिला सस्ता बाजार या फेसबुक अकाऊंटवर एक ड्रेस दिसला होता. हा ड्रेस तिला आवडल्याने तिने तो ड्रेस खरेदीसाठी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. यावेळी समोरील व्यक्तीने तो सस्ता बाजार कंपनीचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगून तिला दोन ड्रेस पाठवतो असे सांगितले. त्यासाठी त्याने तिला तेराशे रुपये ऑनलाईन पाठविण्यास सांगितले. त्याने तिला एक स्कॅनर पाठविला होता. त्यानंतर तिने त्याला तेराशे रुपये ट्रान्स्फर केले होते. दोन दिवसांपूर्वी तिने तिच्या पतीला फोन करुन तिच्या खात्यातून पैसे डेबीट होत असल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्या पतीने तिचे ई-वॉलेट तपासले. त्यात तिच्या बँक खात्यातून दोन दिवसांत १ लाख ३८ हजार रुपये विविध बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले.
ड्रेससाठी पैसे पाठविल्यानंतर ही रक्कम डेबीट झाली होती. त्यामुळे तिने संबंधित व्यक्तीला कॉल केला होता. यावेळी त्याने तिचे सर्व पैसे रिफंड होतील असे सांगतले. मात्र त्याने तिला पैसे पाठविले नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने समतानगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.