मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ मे २०२४
मुंबई, – क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉईट रिडीम करुन देतो असे सांगून कार्डची माहिती प्राप्त करुन एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणुक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीची तक्रार प्राप्त होताच अवघ्या काही तासांत एमएचबी पोलिसांनी फसवणुक झालेली शंभर टक्के रक्कम वाचविण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे ही रक्कम पुन्हा तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सायबर पोलीस पोर्टलसह एमएचबी पोलिसांच्या प्रयत्नामुळे ही रक्कम परत मिळाल्याने तक्रारदाराने संबंधित पोलीस पथकाचे आभार व्यक्त केले आहे.
तक्रारदार दर्शिल नगरशेट हे बोरिवलीतील डी. एन म्हात्रे रोड, अजंता विशाल अपार्टमेंटमध्ये राहतात. काही दिवसांपूर्वीच त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. या व्यक्तीने तो त्यांच्या बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉईट रिडीम करण्याचा बहाणा करुन त्याने त्यांच्या कार्डची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. ही माहिती घेतल्यानंतर त्याने त्यांच्या कार्डवरुन १ लाख ४५ हजार रुपयांचे ऑनलाईन व्यवहार केला होता. ही रक्कम बँक खात्यातून डेबीट झाल्याचा मॅसेज येताच त्यांना फसवणुकीचा हा प्रकार समजला. त्यामुळे त्यांनी तात्काळ सायबर पोलीस पोर्टलवर तक्रार केली होती. या तक्रारीची अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सायबर सेल विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश किरपेकर, पोलीस हवालदार रविंद्र पाटील, महिला पोलीस शिपाई सोनाली इलग यांनी तपास सुरु केला होता. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्याची माहिती काढून संबंधित नोडल अधिकार्यांना संपर्क साधला होता. त्यानंतर या अधिकार्यांनी या बँक खात्यातील व्यवहार थांबवून ही रक्कम गोठवली होती. आता ही रक्कम पुन्हा तक्रारदाराच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.