केवायसी अपडेटच्या नावाने पोलीस अधिकार्याची फसवणुक
ओटीपी शेअर केल्यानंतर सायबर ठगाकडून ४.८२ लाखांचा अपहार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ डिसेंबर २०२४
मुंबई, – मुंंबई पोलीस दलातील संरक्षण विभागात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकार्यालाच अज्ञात सायबर ठगाने गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. केवायसी अपडेटच्या नावाने दोन्ही बँक खात्याची माहिती काढून ओटीपी क्रमांक सांगण्यास प्रवृत्त करुन या सायबर ठगाने त्यांच्या दोन्ही बँक खात्यातून ४ लाख ८२ हजाराचा अपहार केला. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. एका पोलीस अधिकार्याची सायबर ठगाने केलेल्या फसवणुकीने पोलीस दलात आश्चर्य व्यक्त होत आहे.
५३ वर्षांचे तक्रारदार मुंबई पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत घाटकोपर येथील पंतनगर पोलीस वसाहतीत राहत असून ते संरक्षण शाखा चार येथे कामाला आहेत. त्यांचे दोन विविध बँकेत बचत खाते असून ते अनेकदा ऑनलाईन व्यवहार करतात. १२ डिसेंबरला दुपारी तीन वाजता ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो त्यांच्या बँकेतील मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या बँक खात्याची केवायसी अपडेट झाले नसून त्यांचे खाते लवकरच फ्रिज होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी केवायसी अपडेट करण्याची प्रोसेसची विचारणा केली होती. यावेळी त्यांनी त्यांना काही ओटीपी क्रमांक पाठवून त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. तो बँकेचा मॅनेजर असल्याने त्यांनीही कुठलीही शहानिशा न करता त्याला ओटीपी क्रमांक दिला होता. त्यानंतर त्यांचे इतर काही बॅक खात्यात लिंक आहे का अशी विचारणा केली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दुसर्या बँकेची माहिती दिली होती.
दोन्ही बँक खात्याचे ओटीपी शेअर केल्यांतर त्यांच्या दोन्ही बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार झाले होते. काही वेळानंतर त्यांना त्यांच्या खात्यातून ४ लाख ८२ हजार ४०५ रुपयांचे डेबीट झाल्याचे मॅसेज प्राप्त झाले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी पंतनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ऑनलाईन फसवणुकीसंदर्भात पोलिसांकडून सतत जनजागृती केली जात असताना या सायबर ठगाने चक्क एका पोलीस अधिकार्यालाच केवायसीच्या नावाने ४ लाख ८२ हजारांना गंडा घातल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.